Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

गणित उखाणे

      
        गणित उखाणे /कोडी संग्रह
                   (१ ते १७५)


१)
राखी पोर्णिमेस बहिनीने,
हातात बांधल्या राख्या |
दोन ने पूर्ण भाग न जाणा-या,
सा-याच विषम संख्या |

२)
पंकजला आमच्या  लाडाने,
सगळेच म्हणतात पंख्या |
दोन ने पूर्ण भाग जाणा-या,
संख्यांना म्हणतात समसंख्या |

३)
गणपतीच्या मिरवणूकीत,
असतात सुंदर सुंदर झाक्या |
एक किंवा तिनेच भाग जाणारी,
संख्या असते मूळसंख्या |

४)
गाय बांधायला लाकडाची,
रोवली जमिनीत मेख |
एक अंकी लहानात लहान,
संख्या म्हणजे आहे एक |

५)
पोर्णिमेचा पूर्ण चंद्र,
आकाशात मस्त पहा |
दोन अंकी लहानात लहान,
संख्या आहे दहा |

६)
पेढे खायला असवा,
आपला सर्वात पुढे नंबर |
तीन अंकी लहानात लहान,
संख्या आहे शंभर |

७)
बरणीला इंग्रजीमधून,
आपण सारे म्हणतो जार |
चार अंकीलहानात लहान,
संख्या आहे एक हजार |

८)
अर्जूनाने गदेचा केला,
दुर्योधनाच्या डोक्यात प्रहार |
पाच अंकी लहानात लहान,
संख्या आहे दहा हजार |

९)
वाघाच्या अंगावरचे केस,
रेशमासारखे मऊमऊ |
एक अंकी मोठ्यात मोठी,
संख्या म्हणजे आहे नऊ |

१०)
नाटकी मुलांच्या तोंडाला,
कधीच मुळी नसत चव |
दोन अंकी मोठ्यात मोठी,
संख्या आहे नव्व्यान्नव /

१०)
नाटकी मुलांच्या तोंडाला,
कधीच मुळी नसते चव |
दोन अंकी मोठ्यात मोठी,
संख्या आहे नव्व्यान्नव |

११)
गुलाबाच्या पाकळ्यांवर,
चमकणा-या हि-यासम दव |
तीन अंकी मोठ्यात मोठी,
संख्या नऊशे नव्व्यान्नव |

१२)
रावणाला बिभीषणाची कधी,
आलीच नाही कणव |
चार अंकी मोठ्यात मोठी,
संख्या नऊ हजार नऊशे नव्व्यान्नव |

१३)
मनोभावे देवाच्या पाया,
पडणाराचे दैन्य जाते |
कोणत्याही संख्येस शुन्यने गुणल्यास,
उत्तर बघा शुन्यच येते |

१४)
उंच मानेचा उंच उंट झाडांचा,
पाला बघा कसा  भरभर खातो |
एककस्थानी ०,२,,४,६व ८ असलेल्या संख्येस,
दोनने निःशेष भाग जातो |

१५)
वनराराजा थकून भागून गेल्यास,
जंगलातील गुहेत आराम करतो |
एककस्थानी ० व ५ असलेल्या संख्येस,
पाचने निःशेष भाग जातो |

१६)
भुतांचा राजा वेताळ नेहमीच,
विक्रमादित्य राज्याच्या पाठीवर बसतो |
ज्या संख्येस २ व ३ने निःशेष भाग जातो,
त्या संख्येस सहानेही निःशेष भाग जातो |

१७)
जंगलातला वाघोबा दादा भोपळ्यातल्या,
म्हातारीला गोष्टीत प्रचंड हसतो |
ज्या संख्येस ३व४ने निःशेष भाग जातो,
त्या संख्येस बारानेही निःशेष भाग जातो |

१८)
मारोतीराया मुर्छित लक्ष्मणासाठी,
संजीवनी बुटीचा पर्वतच आणतो |
ज्या संख्येस ३व५ने निःशेष भाग जातो,
त्या संख्येस पंधरानेही निःशेष भाग जातो |

१९)
वनामधे पिसारा फुलवून मोर,
छान नाचत नाचत दाणे खातो |
ज्या संख्येस ८व९ने निःशेष भाग जातो,
त्या संख्येस बहात्तरनेही निःशेष भाग जातो |

२०)
सकाळी सकाळीच कशी कोण जाणे,
सूर्य नारायणाला येते हो जाग |
व्यवहारी अपूर्णांकातील छेद म्हणजे,
वस्तूचे केलेले समान भाग |

२१)
झोपेतून सकाळी ऊठवताच येतो,
आळशी मुलांना भलताच राग |
व्यवहारी अपूर्णांकातील अंश म्हणजे,
वस्तूचे घेतलेले समान भाग |

२२)
दिवाळी सणात नसतो मुळीच,
आपल्या आनंदाला तोटा |अंशाधिक अपूर्णांकातील अंश,
हा असतो छेदापेक्षा मोठा |

२३)
घोड्याच्या घरास तबेला तर,
गाईच्या घरास म्हणतात गोठा |
छेदाधिक अपूर्णांकातील छेद,
हा अंशापेक्षा असतो मोठा |

२४)
पोर्णिमेच्या रात्री आकाशात,
चंद्र चांदण्यासोबत खेळतो |
अंश व छेदास एकाच संख्येने गुणल्यास,
सममूल्य अपूर्णांक मिळतो |

२५)
देवळातील देवा पुढे नंदादीप,
मंदमंदपणे शांत जळतो |
अंश व छेदास एकाच संख्येने भागल्यास,
सममूल्य अपूर्णांक मिळतो |
२६)
मृगजळामागे पळणा-या हरणाला,
पाण्याचा भास हा नेहमीच खोटा असतो |
अंश समान असणा-या अपूर्णांकात,
ज्याचा छेद लहान, तो अपूर्णांक मोठा असतो |

२७)
महान माणसांसोबत सतत राहणारा,
अगदी लहान मानवही महान असतो |
छेद समान असणा-या अपूर्णांकात,
ज्याचा अंश लहान, तो अपूर्णांक लहान असतो |

२८)
आकाशातल्या चंद्राला लोक प्रेमाने,
रजनीकांत आणि शशांक म्हणतात |
ज्या अपूर्णांकाचा छेद १० किंवा दहाच्या घातांकात असतो....
त्या अपूर्णांकास दशांश अपूर्णांक म्हणतात |

२९)
सिंहाने ठोकली आरोळी,
प्रचंड  गगनभेदी |
नफा बरोबर आहे,
विक्री वजा खरेदी |

३०)
शत्रू वर तूटून पडला,
सैन्याचा ताफा |
विक्री बरोबर आहे,
खरेदी आधिक नफा |

३१)
गोल गुळगुळीत दिसतोय,
नदीतला गोटा |
खरेदी बरोबर आहे,
विक्री आधिक तोटा |

३२)
पिंकीताई आमची,
फिरती गोल चक्री |
तोटा बरोबर आहे,
खरेदी वजा विक्री |

३३)
कुंभकर्णाच्या समोर,
रावण दिसतो छोटा |
विक्री बरोबर आहे,
खरेदी वजा तोटा |

३४)
संगमरवरी घरात,
बसायला सोफा |
खरेदी बरोबर आहे,
विक्री वजा नफा |

३५)
अमावस्येला काळ्या रात्री सारे,
पांढ-या चांदण्यांनी व्यापले अंबर |
सरळव्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर |

३६)
बागेतला मोर,
मोठा तुर्रेबाज |
रास बरोबर आहे,
मुद्दल आधिक व्याज |

३७)
महान भारतातल आहे,
महान महाराष्ट्र राज्य |
ल.सा.वि.म्हणजे,
लघुत्तम साधारण विभाज्य |

३८)
इंग्रजांनी माजवले होते,
भारतात अराजक |
म.सा.वि. म्हणजे,
महत्तम साधारण विभाजक |

३९)
पंखा फिरून त्यान वारा नाही दिल्यास,
रागात म्हणू त्याला आम्ही पंख्या |
पहिली संख्या बरोबर आहे,
लसावि गुणिले मसावि छेद दुसरी संख्या |

४०)
गुलाबाच्या झाडाची कळी,
फुल होऊन गालात हसावी |
मसावि बरोबर आहे ,
दोन संख्यांचा गुणाकार छेद लसावि |

४१)
आम्हाला चिडवणा-याची गाडी,
फस्सकन चिखलातच फसावी |
लसावि बरोबर आहे ,
दोन संख्यांचा गुणाकार छेद मसावि |

४२)
सगळ्यांनाच खूप आवडतो,
क्रिकेटचा खेळ |
वेग बरोबर आहे,
अंतर भागिले वेळ |

४३)
उन्हाळ्यात जमिनीला,
पडते मोठी भेग |
गाडीला लागणारा वेळ बरोबर,
गाडीची लांबी छेद ताशी वेग |

४४)
श्रीमंताना असते त्यांच्या,
पैशाची नुसती धुंदी |
आयताची परिमिती बरोबर,
दोन कंसात लांबी आधिक रंदी |

४५)
शंभो महादेवासमोर,
बसलेला भव्य नंदी |
आयताचे क्षेत्रफळ बरोबर,
लांबी गुणिले रूंदी |

४६)
बाजारात होत असते कधी,
एखाद्या मालाची अचानक मंदी |
आयताची लांबी बरोबर आहे,
कंसात परिमिती छेद दोन, कंस बंद वजा रुंदी|

४७)
आंबादासच्या बायकोला सारे,
लाडेलाडे म्हणतात आंबी |
चौरसाची परिमिती बरोबर,
चार गुणिले बाजुची लांबी |

४८)
काश्मीर हा जणू,
भारताचा स्वर्ग |
चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर,
बाजूचा वर्ग |

४८)
मोबाईल आल्यामुळे धूळखात,
घरात पडून आहेत टेलिफोन |
समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर,
कर्णाच्या लांबीचा गुणाकार छेद दोन |

४९)
आईच्या मोबाईलमधे वाजते,
देवाच्या आरतीची टोन |
त्रिकोनाचे क्षेत्रफळ बरोबर,
पाया गुणिले उंची छेद दोन |

५०)
ताई दादाच्या रोजच्या भांडणात,
आई बाबांच नेहमीच असतं मौन |
काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर,
काटकोन करणा-या बाजूंचा गुणाकार छेद दोन |
           
५१)
घनदाट अरण्यातला असतो,
बिकट अवघड काटेरी मार्ग |
काटकोन त्रिकोणात कर्ण वर्ग बरोबर,
पाया वर्ग आधिक उंची वर्ग |
५२)
गोड गोजिरी मंडपातली नवरी,
सा-या व-हाडीच्या मनात कशी ठसते |
त्रिकोनाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज,
एकशी ऐंशी अंश असते |

५३)
कठीण कवच असणारे नारळ,
आत मात्र एवढे कडक  नसते |
दोन कोटीकोनांच्या मापाची बेरीज,
नेहमीच नव्वद अंश असते |

५४)
पाण्यातली मासळी बिचारी,
जाळ्यात नकळतच फसते |
दोन पुरक कोनाच्या मापाची बेरीज,
नेहमीच एकशे ऐंशी अंश असते |

५५)
गाईला शिंग नेहमीच असतात दोन |
नव्वद अंश मापाचा असतो काटकोन |

५६)
देवाने पक्ष्यांना छान,
पंख दिलेत दोन |
एकशे ऐंशी अंश मापाचा,
असतो सरळ कोन |

५७)
होता जीवा म्हणून वाचला हो शिवा |
व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा |

५८)
रिमझिम रिमझिम पावसात लहानांना,
भिजायची वाटते फारच मज्जा |
वर्तुळ केंद्रातून निघून परिघास,
मिळणारा रेषाखंड म्हणजे त्रिज्या |


५९)
आपण राहतो ते घर असते,
इंद्र राहतो तो असतो स्वर्ग |
वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर,
पाय गुणिले त्रिजेचा वर्ग |

६०)
शरीरातल्या कोणत्याही हाडाला,
इंग्रजी भाषेत म्हणतात बोन |
अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर,
पाय गुणिले त्रिजेचा वर्ग छेद दोन |


६१)
पायावर मोठा धोंडा पडल्यावर,
कुणाचाही जीव होतो कासाविस |
वर्तुळाची त्रिज्या बरोबर आहे,
वर्गमुळात क्षेत्रफळ गुणिले सात छेद बावीस |

६२)
खाण्यासाठी मानवाला देवानं,
दिलेत मोजून दातं बत्तीस |
अर्धवर्तुळाची त्रिज्या बरोबर आहे,
परिमिती गुणिले सात छेद छत्तीस |


६३)
झारखंड नावाच्या राज्याच्या,
राजधानीच नाव आहे रांची |
इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर,
लांबी गुणिले रूंदी गुणिले उंची |

६४)
चूक कुणीच स्विकारत नसत,
चुक नसते ना याची ना त्याची |
काटकोनी चितीचे घनफळ बरोबर,
पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची |

६५)
ऋषीमुनी स्नान करतांना पूर्वी,
न चुकता सूर्याला द्यायचे अर्घ्य |
गोलाचे पृष्ठफळ बरोबर आहे,
चार पाय गुणिले त्रिजेचा वर्ग |

६६)
देवाच्या भजनात असावे,
तल्लीन तन आणि मन |
घनचितीचे घनफळ बरोबर,
बाजूचा घन |

६७)
तोच यशस्वी होतो,
जो काढतो संकटातून मार्ग |
घनाचे पृष्ठफळ बरोबर आहे,
सहा कंसात बाजूचा वर्ग |

६८)
आपल ज्ञान खर असाव,
ते नसाव पोपटपंची |
समांतरभूज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर,
पाया गुणिले उंची |

६९)
आपले गुरूच देत असतात,
आपल्या जीवनाला योग्य आकार |
समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर,
एक छेद दोन गुणिले कर्णाचा गुणाकार |

७०)
कंडक्टर काढतो बसच तिकीट |
साठ सेकंद बरोबर एक मिनिट |

७१)
ढगात आकारांचे होतात भास |
साठ मिनिटे बरोबर एक तास |

७२)
शेतात धान्याची पडली मोठी रास |
तीन हजार सहाशे सेकंद ,
म्हणजेच एक तास |


७३)
अमावस्येला काहीजण म्हणतात आवस |
चोवीस तास बरोबर एक दिवस |

७४)
आंध्रप्रदेशात आवडीने खातात ईडली वडा |
सात दिवसांचा असतो एक आठवडा |

७५)
पत्राळी सोबतच जेवणासाठी
 दिला जातो द्रोण |
नव्वद अंशापेक्षा लहान मापाचा,
असतो लघूकोन |

७६)
तिखट खायला लागत झणझण |
बारा वस्तू म्हणजे एक डझन  |

७७)
डाॅक्टर देतो भारी औषधांचा डोस |
बारा डझन म्हणजेच एक ग्रोस |

७८)
शेतात जाणारा चिखलाचा रस्ता |
चोवीस कागद बरोबर एक दस्ता |

७९)
उन्हाळ्यात सारे खातात आईसक्रीम |
वीस दसात्यांचा मिळून होतो एक रिम |

८०)
तोच दुकानदार हुशार,
जो विकतो नगद |
एक रिम बरोबर चारशे ऐंशी कागद |

८१)
दातांशी संबंधित असते इंग्रजीत डेंटल |
शंभर किलोग्रॅम म्हणजे एक क्विंटल |

८२)
पाण्यासारखं निर्मळ असाव मन |
दहा क्विंटल म्हणजे एक टन |

८३|
मोबाईलची माझ्या सोळा जी बी रॅम |
एक टन म्हणजे एक हजार किलोग्रॅम |

८४)
गरागरा फिरतय गोल चाकाच मिटर |
एक क्युसेक म्हणजे एक हजार घन लिटर |

८५)
राणी लक्ष्मीबाईच्या नावा बरोबर,
नाव येत लगेच झाशी |
जीची किंमत बदलत नाही,
ती असते अचलराशी |

८६)
साखरे सारखाच असतो,
 गोड चवीला गूळ |
काटकोनास अंतरलिखित करणारा,
कंस म्हणजे अर्धवर्तुळ |

८७)
मुख्य दिशा पूर्व, पश्चिम,
दक्षिण आणि उत्तर |
अपूर्णांक म्हणजेच,
दोन संख्यांच गुणोत्तर |

८८)
जन्मदात्या पित्यास म्हणतात जनक |
अवयव म्हणजे संख्या किंवा
बहुपदीचे गुणक |

८९)
आपण प्रथम भारतीय आहोत ,
नंतर बौद्ध, मुस्लिम वा हिंदू |
सुरूवात ज्या बिंदूपासून होते,
तोच असतो आरंभ बिंदू |

९०)
वर्तमान पत्रातील मुख्य लेखाला,
त्या वर्तमान पत्राचा अग्रलेख म्हणतात |
संख्येशी निगडीत असलेल्या बिंदूला,
त्या संख्येचा आलेख म्हणतात |

९१)
लहान मुलांना नेहमीच,
वाटत असते भूताची भिती |
वीटे सारख्या आकाराची,
असते इष्टिकाचिती |

९२)
छत्रपती शिवरायांच्या काळी व्यवहारसाठी,
जे चलन वापरायचे त्याला होन म्हणतात |
दोन रेषांचे एकमेकींपासून कलने,
ज्या मापाने दाखवतात त्याला कोन म्हणतात |

९३)
जोरात पळाल की लागते धाप |
एकक म्हणजे प्रमाणित माप |

९४)
लाल तोंडाच्या माकडा माकडा हूप |
शेपटीला तुझ्याच रे शेरभर तूप |
परस्परावर ठेवलेल्या दोन आकृत्या तंतोतंत जुळल्यास,
त्यांना म्हणावे एकरूप |

९५)
लक्ष्मण गो-या रंगाचा,
श्रीरामाचा निल वर्ण |
काटकोनाच्या समोरील
बाजूस,म्हणतात कर्ण |

९६)
लाजाळूच्या झाडाला करून बघा स्पर्श |
तिनशे पासष्ट दिवसांचे होते एक वर्ष |

९७)
मडक्यांची छान घरात उतरंड |
रेषेचा तुकडा म्हणजेच रेषाखंड |

९८)
गांधीजींनी चालू केली असहकार चळवळ |
वस्तूने व्यापलेली जागा म्हणजे तिचे घनफळ |

९९)
तव्यावरची भाकरी आई चांगली गरम भाज |
व्याजावर वाढणार व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज |

१००)
शिवरायांनी शायिस्तेखानाला,
घडविली मोठीअद्दल |
चक्रवाढ व्याज बरोबर,
रास वजा मुद्दल |

१०१)
कबड्डी आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ |
अंतर बरोबर वेग गुणिले वेळ |

१०२)
आंधळ्या बहि-याला लागतो सारा मेळ |
वेग बरोबर आहे अंतर भागिले वेळ |

१०३)
आकाशात दाटले काळे काळे मेघ |
वेळ बरोबर आहे अंतर भागिले वेग |

१०४)
अंकुश नावाच्या मुलाला पोर,
चिडवतांना म्हणतात अंक्या |
सरासरी बरोबर आहे एकूण बेरीज,
छेद परिमाण संख्या |

१०५)
श्रावण महिन्यात आकाशातून,
कोसळतात पावसाच्या सरी |
एकूण बेरीज बरोबर आहे,
परिमाण संख्या गुणिले सरासरी |

१०६)
श्रीकृष्णाला अनेक नावे,
कुणी म्हणे नारायण कुणी म्हणे हरी |
संख्या बरोबर आहे,
एकूण बेरीज छेद सरासरी |

१०७)
मामाच्या बायकोला मामी तर,
काकाच्या बायकोला म्हणतात काकी |
भाज्य बरोबर आहे, भाजक
गुणिले भागाकार अधिक बाकी |

१०८)
पावसात सारी मुलं मजेत नाचतात |
एका बिंदूतून अनंत रेषा जातात |

१०९)
परस्परात प्रेम वाढवून घट्ट करूया नाते |
दोन बिंदूमधून एक आणि,
एकच रेषा जाते |

११०)
पाच पांडवातील अर्जूनाला,
पार्थ किंवा कौंतेय असे म्हणतात |
गृहितका आधारे जो गुणधर्म सिद्ध होतो,
त्यालाच प्रमेय असे म्हणतात |

१११)
हुशार विद्यार्थ्यांचे नेहमीच,
शिकण्याकडे ध्यान असते |
कोनाचे माप हे शुन्य अंश ते ,
एकशे ऐंशी अंश दरम्यान असते |

११२)
कर्ज या मराठीतील शब्दाला,
इंग्रजीमध्ये लोन म्हणतात |
दोन कोनांची मापे सारखी असल्यास,
त्यांना एकरूप कोन म्हणतात |

११३)
विष्णुच्या हाती सुदर्शन चक्र,
कमळ, गदा आणि शंख |
मापनासाठी वापरलेले ,
संकेत चिन्ह म्हणजेच अंक |

११४)
माणसाला चालायला, पळायला,
देवाने पाय दिलेत दोन |
नव्वद अंशापेक्षा जो मोठा असतो,
तो असतो विशालकोन |

११५)
साप कधीच हटकून कुणाला,
करत नसतो विनाकारणची दंश |
त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज,
असते एकशे ऐंशी अंश |

११६)
प्रजननाद्वारे सजीव सगळे,
वाढवत असतात आपापला वंश |
चौकोनाच्या चारही कोनाच्या..
मापाची बेरीज तिनशे साठ अंश |

११७)
आपल्याला कोण सोडवणार आहे,
संत महात्यांखेरीज |
चौकोनाची परिमिती बरोबर,
चारही बाजूंच्या लांबीची बेरीज |

११८)
लहान बाळाला खेळण्यासाठी,
छान खुळखुळे बनतात |
त्रिज्या समान असणा-या वर्तुळांना,
एकरूप वर्तुळे म्हणतात |

११९)
गरजाणारे आभाळ कधी पडत नसते |
अर्धवर्तुळाचे माप एकशे ऐंशी अंश असते |

१२०)
कोकणातल्या लोकांचे मुख्य अन्न भात |
पायची किंमत असते बावीस छेद सात |

१२१)
गणपती बाप्पांचे वाहन आहे मूषक |
दहा एककांचा होतो एक दशक |

१२२)
पाण्यात पोहतात पांढरे शुभ्र बदक |
दहा दशकांचा होतो एक शतक |

१२३)
वर्गातला बंड्या गुरूजींचा हस्तक |
शंभर एकक मिळून होतो एक शतक |

१२४)
आई करते माया आणि वडील देतात मार |
दहा शतकांचा होतो एक हजार |

१२५)
संभाजीराजे आपले शूर होते फार |
दहाहजार बरोबर एक दश हजार |

१२६)
बिभिषणाने घेतला रामाचा पक्ष |
दहा दशहजारांचा होतो एक लक्ष |

१२७)
मांजराचे आवडते उंदीर आहे भक्ष्य |
दहा लक्ष मिळून होतो एक दशलक्ष |

१२८)
शिवराय जन्मले जिजाऊंच्या पोटी |
दहा दशलक्षांचा होतो एक कोटी |

१२९)
सांगू नका कुणाला बातमी कधी खोटी |
दहा कोटी मिळून होतो एक दशकोटी |

१३०)
कुत्र्याच सदा वाकडं असतं शेपुट |
बारा इंच बरोबर आहे एक फूट |

१३१)
घराला संरक्षण देणारा असतो गार्ड |
तीन फूट म्हणजे एक यार्ड |

१३२)
शाळेतल्या मुलांची शिस्तीत चालते रांग |
दोनशे वीस यार्ड बरोबर एक फर्लांग |

१३३)
चित्रात मोहक रंग भरून आपले चित्र,
जीवंत करत असतो महान चित्रकार |
ए छेद बी बरोबर सी छेद डी असेल तर..
अंत्य पदाचा गुणाकार बरोबर मध्य पदांचा गुणाकार |

१३४)
दह्यापासून बनते त्यास श्रीखंड म्हणतात,
आंब्याचे बनते त्यास आम्रखंड म्हणतात |
दोन भिन्न बिंदू दरम्यानच्या,
सर्व बिंदू संचाला रेषाखंड म्हणतात |

१३५)
मोबाईलला मराठीत भ्रमणध्वनी म्हणतात,
दूरध्वनीला इंग्रजीत म्हणतात टेलिफोन |
एकाच आरंभ बिंदत आसलेल्या पण विरूद्ध किरण नसलेल्या..
दोन किरणांच्या संयोग संचास म्हणतात कोन |

१३६)
शेतक-याचा खरा मित्र म्हणजे बैल |
एकहजार सातशे साठ यार्ड म्हणजे एक मैल |

१३७)
ताप आला की सूई टोचतो डाॅक्टर |
दोन दशांश चार सात एकर म्हणजे एक हेक्टर |

१३८)
शेतक-यान बांधली त्याच्या,
शेतात एक छान  खोपी |
एक किलो वॅट बरोबर,
एक दशांश तीन चार एच पी |

१३९)
मॅडमला थोडक्यात म्हणतात मॅम |
एक टन बरोबर एक हजार किलोग्रॅम |

१४०)
पाणी गरम करायला असते हिटर |
एक हजार घन सेमी बरोबर एक लिटर |

१४१)
अभ्यास केला तर गुणांची हमी |
एक फूट बरोबर तीस दशांश पाच सेमी |

१४२)
स्वराज्यास्तव शिवरायांनी केली सुरतेची लूट |
एक मीटर बरोबर तीन दशांश दोन पाच फूट |

१४३)
वीज किती वापरली ते सांगते मीटर |
एक यार्ड बरोबर...
शुन्य दशांश एक नऊ चार मीटर |

१४४)
हिवाळ्यात खावा काजू,बदाम,पिस्ता |
चोवीस कागदांचा होतो एक दस्ता |

१४५)
तेलाचा डबा खूप तेलकट असतो |
वर्तुळाचा व्यास त्रिजेच्या दुप्पट असतो |

१४६)
हत्ती समोर मुंगीच काय भरेल वजन |
सहा वस्तू म्हणजे अर्धा डझन |

१४७)
महेंद्रसिंग धोनी आहे प्रसिद्ध हिटर  |
एक गुंठे बरोबर एक हजार एकोणनव्वद मीटर |

१४८)
शेतातल्या झोपडीला बोराटीच दार |
एक हेक्टर बरोबर शंभर आर |

१४९)
राजू आहे चिडका त्याला म्हणतात चिटर |
शंभर सेंटीमिटर बरोबर एक मीटर |

१५०)
रोहित शर्मा भारताचा आहे मोठा हिटर |
एकहजार मिली लिटर म्हणजे एक लिटर |

१५१)
सकाळी सकाळी देवाचे भजन म्हणा |
तीस दिवस बरोबर एक महिना |

१५२)
पास झाल्यावर मुलांना होतो हर्ष |
बारा महिने बरोबर एक वर्ष |

१५३)
खंडोबाच्या गळ्यात सोन्याचा कंठा |
शंभर चौरस मीटर बरोबर एक गुंठा |

१५४)
गावात शांतता हवी, नको उगी तंटे |
एक एकर बरोबर चाळीस गुंठे |

१५५)
पोट भरल्यावर येतो मोठा ढेकर |
एक हेक्टर बरोबर दोन दशांश पाच एकर |

१५६)
ह्रदयासाठी खावे रोज जेवनात जवस |
एकहजार चारशे चाळीस मिनिट..
म्हणजे एक दिवस |

१५७)
माकडाची टोपी झाली जरा सैल |
आठ फर्लांग म्हणजे एक मैल |

१५८)
वाईट आहे मुक्या प्राण्यांना,
स्वार्थासाठी पळवणे |
बेरीज म्हणजे एका संख्येत,
दुसरी संख्या मिळवणे |


१५९)
मोठे रागात आले की बाळगावे मौन |
आयताचे चारही कोन असतात काटकोन |

१६०)
वणव्याच्या आगीचे जंगलात पसरले लोन |
चौरसाचे चारही कोन असतात काटकोन |

१६१)
भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च बहुमान |
चौरसाच्या चारही बाजू असतात समान |

१६२)
शीत कटीबंधातले थंड असते हवामान |
आयताच्या समोरासमोरील बाजू असतात समान |

१६३)
भीम होता प्रचंड बलशाली,
अंगात त्याच्या दहा हत्तीच बळ |
आकृतीने व्यापलेली सपाट जागा,
मोजण्याचे माप म्हणजे क्षेत्रफळ |

१६४)
दूध तापवले की त्यावर येते साय |
रोमनांकात एक साठी लिहतात आय (I) I

१६५)
काॅपी काढण्यासाठी करतात झेराॅक्स |
रोमनांकात दहासाठी लिहतात एक्स (X) |

१६६)
कैद्यांना जिथ ठेवल जात, त्याला म्हणतात जेल |
रोमनांकात चाळीसला लिहतात एक्स एल (XL)|

१६७)
चेंडू हवेत पकडला की होतो झेल |
रोमनांकात पन्नासला लिहतात एल (L)|

१६८)
कपाचा जोडीदार नेहमी असते बशी |
रोमनांकात नव्वदला लिहतात एक्स सी (XC)|

१६९)
तुपाला हिंदी भाषेत म्हणतात घी |
रोमनांकात शंभरला लिहतात सी (C)|

१७०)
गुरूजींच्या हातातली गळून पडली छडी |
रोमनांकात पाचशेला लिहतात डी (D)|


१७१)
सर्वांनीच पाळावेत रहदारीचे नियम |
रोमनांकात नऊशेला लिहतात सी एम (CM)|

१७२)
देवळात उदबत्तीचा सुवास येतो घमघम |
रोमनांकात हजारला लिहतात एम (M)|

१७३)
कवायतीला वाजतो शाळेत ढोल |
चेंडूचा आकार हा असतो गोल |

१७४)
अंकिताला लाडाने म्हणतात सारेच अंकू |
विदुषकाच्या टोपीचा आकार असतो शंकू |

१७५)
आईच्या प्रेम असते जगात अनमोल |
काकडीचा आकार असतो दंडगोल |

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा