Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

इयत्ता दहावी, मराठी,2.बोलतो मराठी



परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता.
बायको : ‘‘तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?’’
नवरा : ‘‘नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार!’’
आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण ‘बनवणे’ हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून 
आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात 
रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त ‘बनवले’ 
जातात. मराठीत ‘बनवणे’ म्हणजे ‘फसवणे’ असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा
माणूस ‘बनवणारा’ जादूगार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही.
मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत ‘मारणे’ हे एक क्रियापद घेतले तर ते किती 
वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, 
शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. ‘मारणे’ म्हणजे ‘मार 
देणे’ हा अर्थयात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते.
शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. ‘खस्ता खाणे’ मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही, 
हे माहीत आहे ना? तसेच ‘कंठस्नान घालणे’ हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे 
गळ्याखालून ‘अंघोळ घालणे’, असा शब्दश: अर्थ नाही. ‘खांद्याला खांदा लावणे’ (सहकार्य करणे) आणि ‘खांदा देणे’ 
(प्रेताला खांदा देणे) यांतला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले, तर अर्थाचा अनर्थ होईल. 
अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. ‘अक्कलवान’ म्हणजे हुशार; पण 
‘अकलेचा कांदा’ म्हणजे ‘अतिशहाणा’ हे माहीत नसेल, तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय, हेच 
आपल्याला कळणार नाही.
क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा
गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे 
(सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा
अनेकदा चुकलेली असते. उदा., ‘तुझी मदत करणे’ याऐवजी ‘तुला मदत करणे’ हवे. ‘त्यांचे धन्यवाद’ याऐवजी ‘त्यांना
धन्यवाद’ असे म्हणायला हवे.
भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे 
इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक 
भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. ‘टेबल’ हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर 
भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. ‘मी स्टडी केली’ म्हणण्यातून काय नवीन 
अर्थ कळतो? त्याऐवजी ‘मी अभ्यास केला’ म्हणणं योग्य नाही का?

कृती-१
भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय 
i)योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे
(ii) क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे 

उताऱ्यात निर्देश केलेले शब्दाच्या अर्थाचे दोन प्रकार
i) शब्दाचा मूळ अर्थ (वाच्यार्थ)
ii) मूळ अर्थाहून वेगळा रूढ झालेला अर्थ (लक्ष्यार्थ) 

iii)भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उताऱ्यात सुचवलेले मार्ग i)क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे .
ii) मराठीचे व्याकरण झुगारून परभाषेतील शब्द न वापरणे 
iii)शब्दकोश वापरणे

(२) विनोद करणाऱ्या नवऱ्याने पुढील वाक्याचा लावलेला अर्थ लिहा : तुम्हांला मी उत्तप्पा बनवू का? 
उत्तर-मी तुमचे उत्तप्यामध्ये रूपांतर करू का?


(३) कधी कधी वाक्यातून विपरीत अर्थ व्यक्त होतो, त्यामागील कारण लिहा.
उत्तर- मराठी शब्दाचा रूढ अर्थ बाजूला सारुन त्या शब्दाला असलेला परभाषेतला अर्थ घेऊन वाक्य तयार केली जातात, त्यामुळे विपरीत अर्थ व्यक्त होतो. 


कृती-2
कृती २ : (आकलन कृती) 
(१) उताऱ्याच्या आधारे पुढील चौकटी पूर्ण करा : 
(i) हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद -बनवणे
 (ii) मराठी भाषेची श्रीमंती-मराठी ढगांचे शब्दप्रयोग
 (iii) मूळ अर्थाखेरीज अन्य अनेक अर्थछटा व्यक्त करणारे उताऱ्यात उल्लेखलेले क्रियापद -मारणे
(iv) मराठी भाषेची खास शैली-वाक्यप्रचार
 (v) एकाऐवजी दुसरेच क्रियापद वापरल्यास होणारा परिणाम- अर्थाचा अनर्थ


 (२) हल्ली आढळून येणाऱ्या आपल्या लोकांच्या दोन चुकीच्या भाषिक सवयी सांगा.
उत्तर- (i) वेगवेगळ्या कृतींसाठी वेगवेगळे शब्द वापरात असताना, त्या कृतींसाठी केवळ एकच शब्द योजला जातो. (ii) गरज नसताना अन्य भाषांतील शब्दांचा वापर केला जातो.

 कृती-३ (व्याकरण कृती)
 (१) वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्त करण्यासाठी वापरले जाणारे तुम्हांला माहीत असलेले क्रियापद सोदाहरण लिहा. (फक्त ४ अर्थछटा)
उत्तर-  (i) महापालिकेने एकाच दिवसात तीनशे बेकायदेशीर बांधकामे पाडली.
 (ii) छपरावर वाळत घातलेले पापड कावळ्यांनी खाली पाडले. 
(iii) चक्कीवरून दळण आणताना गोपू पीठ पाडत पाडतच घरी आला
 (iv) विरोधी पक्षाच्या उमेदवाराने मंत्र्याला प्रचंड बहुमताने पाडले.

 (२) 'वाटणे' हे क्रियापद वापरून वेगवेगळ्या अर्थांची दोन वाक्ये तयार करा.
उत्तर- (i) मी केलेल्या त्या चुकीची मला लाज वाटली. (वाटणे : भावना जाणवणे) (ii) पास झाल्याबद्दल रश्मीने पेढे वाटले. (वाटणे : देण्याची कृती)


 कृती-४ (स्वमत / अभिव्यक्ती)
 (१) भाषा सतत बदलत असते, याची कारणमीमांसा द्या. 
उत्तर : एखाद्या परिसरात, एकमेकांमध्ये सहज मिसळता येईल अशा अंतरात राहणाऱ्या लोकांचा एक समाज बनतो. त्यांची भाषा एकच असते. तिच्यातले शब्द, वाक्य घडवण्याचे नियम हे ती भाषा बोलणाऱ्या सगळ्यांना ठाऊक असतात. आपले बोलणे एकमेकांना समजण्यासाठी ही समानता असणे आवश्यकच असते. एकमेकांचे बोलणे समजण्यासाठी ती भाषा काही काळ तरी स्थिर राहावी लागते. तशी ती स्थिर असतेसुद्धा. मात्र, प्रत्येक पिढीमध्ये त्या त्या ठिकाणाच्या भाषेमध्ये सूक्ष्मपणे बदल होत असतात. जसजसा लोकांचा विकास होतो, तसतशी त्यांची भाषासुद्धा विकसित होत जाते. आधुनिक काळात अनेक समाज एकमेकांच्या जवळ नांदतात. एकमेकांत मिसळतात. या वेगवेगळ्या समाजांचा प्रभाव एकमेकांच्या भाषेवर पडतो. प्रत्येक भाषा अशी बदलत राहते. म्हणून कोणतीही भाषा कधीही स्थिर नसते. तीत सातत्याने बदल होत राहतो. काळ बदलतो, तशी लोकांची जगण्याची रीत बदलते. त्यामुळे भाषेतले शब्द बदलतात. जुने शब्द लोप पावतात. नवीन शब्दांची भर पडते. अन्य भाषांमधील शब्द-संकल्पना स्थानिक भाषेत सामावले जातात. स्थानिक भाषेतील शब्द-संकल्पना अन्य भाषांमध्ये शिरतात. अशा प्रकारे प्रत्येक भाषा प्रत्येक क्षणी बदलत असते. 

(२) 'स्वत:च्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे स्वतःच्या भाषेचा सन्मान करणे होय', हे विधान समजावून सांगा.
 उत्तर : माणसाला एकमेकांशी पाण्याचा महत्त्वाचा धागा म्हणजे भाषा होय. माणूस दुसऱ्याशी बोलतो म्हणजे तो दुसऱ्याजवळ आपले मन प्रकट करीत असतो. प्रत्येक भाषा म्हणजे ती बोलणाऱ्याच्या मनाचा आरसा असते. म्हणूनच कोणतीही भाषा म्हणजे ती बोलणाऱ्यांचे जीवन, त्यांची संस्कृती होय. एखादया भाषेचा सन्मान करणे म्हणजे ती भाषा बोलणाऱ्यांचा सन्मान करणे असते. स्वत:च्या भाषेचा सन्मान आपण कसा करणार? सर्वांत प्रथम म्हणजे मी माझी स्वत:ची भाषा उत्तम रितीने आत्मसात करीन माझे सर्व विचार, भावना माझ्या भाषेत कसोशीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करीन. माझी भाषा उत्तम येण्यासाठी मी माझ्या भाषेतील वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचे नियमित वाचन करीन. माझ्या भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचा आस्वाद घेत राहीन. भाषा चांगल्या रितीने आत्मसात करण्यासाठी शब्दकोश, व्युत्पत्ती कोश यांसारख्या कोशांचा वेळोवेळी मनापासून उपयोग करीन. यामुळे माझे माझ्या भाषेवरील प्रभुत्व वाढेल. अशा प्रकारे स्वत:च्या भाषेवरील प्रभुत्व वाढवणे म्हणजे त्या भाषेचा सन्मान करणे होय.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा