सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
सर्वनाम :- नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणार्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात किंवा नामाऐवजी वापरल्या जाणार्या शब्दाला ‘सर्वनाम’असे म्हणतात.
जसे :- मी,तो,ती,ते,त्यांनी,त्यांना,आम्हाला,तुम्हाला इत्यादी
सर्वनामाचे प्रकार
सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात.
(1)पुरुषवाचक सर्वनाम
(2)दर्शक सर्वनाम
(3) संबंधी सर्वनाम
(4)प्रश्नार्थक सर्वनाम
(5)सामान्य अथवा अनिश्चित सर्वनाम
(6)आत्मवाचाक सर्वनाम
(1) पुरुषवाचक सर्वनाम :- जे सर्वनाम प्रथम पुरुषी ,द्वितीय पुरुषी,तृतीय पुरुषीचे दिग्दर्शन करते त्याला ‘पुरुषवाचक सर्वनाम’असे म्हणतात.प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत फक्त तृतीय पुरुषी सर्वनामे मात्र बदलतात.
उदा.मी,तो,ते,तू,तो,तुम्ही,आम्ही,त्या,ती इत्यादी
जगात बोलणारा,ऐकणारा व ज्याच्याविषयी बोलण्यात येते तो तिसरा असे तिघेच असतात. म्हणून भाषणातही तीन पुरुष असतात.
(अ).प्रथम पुरुषवाचक :- मी,आम्ही,स्वत:,आपण
उदा.(1) मी उद्या गावाला जाणार आहे.(2)आम्ही तुला मदत करु .
(आ).द्वितीय पुरुषवाचक :- तू ,तुम्ही,स्वत:,आपण
उदा.(1) तुम्ही एवढे काम कराच.(2)आपण आत या .
(इ).तृतीय पुरुषवाचक :-तो,ती,ते,त्या,हा,ही,हे,ह्या इत्यादी
उदा. (1)ती अतिशय सुंदर होती.(2)तो आजारी होता.
(2) दर्शक सर्वनाम :-अगोदर माहीत असलेली जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरण्यात येते त्यास ‘दर्शक सर्वनाम’असे म्हणतात.दर्शक सर्वनाम होण्यासाठी (हा,ही,हे,तो,ती,ते)कर्ता म्हणून वापरावे लागतात.
उदा.हा,ही,हे,तो,ती,ते
(1) ही कोण आहे.
(2)ती चलाख आहे.
(3)हा रानटी हत्ती आहे.
जवळच्या वस्तूबद्दल हा,ही,हे वापरले जातात तर लांबच्या वस्तूबद्दल तो,ती,ते वापरतात.
(3) संबंधी सर्वनाम :-वाक्यामध्ये दोन गोष्टीमधील संबंध स्पष्ट करणार्या सर्वनामाला ‘संबंधी सर्वनाम’असे म्हणतात.संबंधी सर्वनामांना अनुसंबंधी सर्वनामे असे सुद्धा म्हणतात.
उदा.जो,जी,जे,ज्या
(1)जो चढतो,तोच पडतो .
(2)जे चकाकते ,ते सोने नसते.
(3)जो करेल,तो भरेल.
(4)प्रश्नार्थक सर्वनाम :- ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना ‘प्रश्नार्थक सर्वनामे’ असे म्हणतात किंवा एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला ‘प्रश्नार्थक सर्वनाम’ असे म्हणतात.
उदा.कोण,काय,कित्येक,कोणास,कोणाला,कोणी इत्यादी
(1) तुला काय पाहिजे ?
(2)कोणी रामायण लिहिले ?
(5)सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम :-वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आले हे जेव्हा निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यास ‘अनिश्चित सर्वनाम’ असे म्हणतात.
उदा.(1) कोणी ,कोणास काय म्हणावे !
(2)हल्ली कोण कोणाला विचारत नाही .
(3)माझ्या मुठीत काय ते सांग पाहू !
(4) कोणी कोणास हसू नये.
(6)आत्मवाचक सर्वनाम :- स्वतःविषयी उल्लेख करण्यासाठी वापरल्या जाणार्या सर्वनामाला ‘आत्मवाचक सर्वनाम’ असे म्हणतात.
उदा. (1)मी स्वत: त्याला पहिले.
(2)आपण खेळायला जाऊ. .
वरील वाक्यात स्वत:,आपण ही दोन्ही आत्मवाचक सर्वनामे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा