'एकी असेल तिथे वास्तव्य करावे'
: प्राचीन काळी चार दिवक्यापालांपैकी वैश्रवण आपल्या पुण्यक्षयामुळे देवलोकांतून पतन पावला. त्याच्या जागी इंद्रानं दुसऱ्या वैश्रवणाला नेमलं. त्याने सगळ्या देवतांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे वसतिस्थान निवडण्यास सांगितलं. त्याकाळी बोधिसत्व हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या देवतांच्या कुळात जन्मला होता. त्यानं जवळच असलेले शालवन वसतीसाठी निवडले आपल्या इतर बांधवांनाही त्यानं तिथच राहण्याचा उपदेश केला. पण काही देवतांना त्याचं बोलणं पटलं नाही. त्यांना आदरसत्काराचा लोभ सुटला. त्या म्हणाल्या, 'या वनात राहिलो तर लोकांकडून मिळणारे बळी मिळणार नाहीत. त्यापेक्षा गावात मोठमोठे वृक्ष आहेत तेथे राहिल्याने लोक आमचा गौरव करतील. अन्नपाण्याला कमी पडणार नाही.' असं म्हणून काही देवता निघून गेल्या काही मात्र बोधिसत्वाबरोबर सुखानं राहू लागल्या. काही दिवसांनी मोठं वादळ होऊन मोठमोठे वृक्ष धडाधड कोसळले. त्यामुळे त्या वृक्षांवर राहणाऱ्या देवतांचे खूप नुकसान झाले. त्या अवस्थेत | त्यांना कुठेच आश्रय घेता येणं शक्य नव्हतं. त्या पुन्हा बोधिसत्वाच्या शालवनात आल्या. पाहतात तो काय ? शालवनात कुठेही वादळाचं चिह दिसत नव्हतं ? सगळीकडे पूर्वीचीच शांतता नांदत होती. तेव्हा त्या बोधिसत्वाला म्हणाल्या, 'आम्ही एवढ्या मोठमोठ्या वृक्षांवर रहात होतो. पण, या भयंकर वादळानं ते समूळ उपटून टाकलं. आमचं खूप नुकसान झालं, आमचं आश्रयस्थानही नष्ट झालं. परंतु तुमच्या या लहानसहान शालवृक्षांच्या वनाला मात्र त्या भयंकर वादळाचा अजिबात धक्का पोहोचलेला नाही हे कसं?" बोधिसत्व म्हणला, 'मित्रांनो आमच्या शालवनांत जरी मोठे वृक्ष नाहीत, तरी इथे छोट्याछोट्या शालवृक्षांची खूप दाटी आहे. जणू ते कोणत्याही संकटाला एकमेकांच्या हातात हात घालून सामोरे जातात नि त्या संकटाला पळवून लावतात. मग या वाऱ्याचं काय चालणार यांच्यापुढे ? त्यांची एक पाहूनच मी हे आश्रयस्थान निवडलं आहे. तुम्ही मात्र लोभाला बळी पडून मोठमोठ्या वृक्षांच्या मागे धावलात त्याचं हे फळ मिळालं.'
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा