'लोभी पहारेकरी'
: एकदा राजवाड्याच्या देवडीवर नवीन पहारेकऱ्यांची नेमणूक झाली होती. हा पहारेकरी फार लबाड होता. राजवाड्यात जाणाऱ्या व्यक्तीकडून काहीना काही बक्षीस उपटल्याशिवाय तो त्याला आता सोडीत नसे. आज बिरबल तो पहारेकरी आल्यापासून प्रथमच राजवाड्यात जात होता. पहारेकऱ्याने त्याला अडविले. बिरबलाने त्याला बरेच समजावून पाहिले, परंतु तो काहीच ऐकायला तयार नव्हता. बिरबलाने ओळखले, याला काहीतरी बक्षीस हवे आहे. तो त्याला म्हणाला, 'हे बघ, आत्ता माझ्याकडे काही नाही. परंतु आज मला बरेच मोठे बक्षीस मिळणार आहे. ते सर्वच्या सर्व मी तुला देईन. मला आत जाऊ दे.' पहारेकऱ्याने रस्ता सोडला आणि बिरबलला सलाम ठोकला. बिरबलाने बादशहाकडे जाऊन त्याची खूप करमणूक केली. बादशहा खूष झाला अन् म्हणाला, 'बिरबल, आज तू काय हवे ते मागून घे.' 'ठीक आहे मला शंभर जोडे मारावेत.' बिरबल म्हणाले, बादशहा बिरबलाची मागणी ऐकून थक्कच झाला. परंतु पुढे काय होते ते पाहण्यासाठी त्याने हुजऱ्याला जोडा घेऊन बोलाविले. बिरबलाने देवडीवरच्या पहारेकऱ्याला आत बोलाविले आणि त्याला बादशहापुढे उभा करीत तो म्हणाला, 'खाविंद, आज माझे बक्षीस या शिपायाला देण्याचे मी कबूल केले आहे. ते त्याला देऊन टाका.' हुजऱ्याने आपले काम केले. शिपाई चांगलाच लालबुंद झाला. पुन्हा त्याने राजवाड्यात जाणाऱ्या लोकांकडे कधीही बक्षीस मागितले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा