'ऋतुराज वसंत'
चैत्र व वैशाख हे महिने वसंत ऋतूचे. कडक उन्हाळा, गुढीपाडवा, गौरीतीज, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, वैशाखात परशुराम जयंती, शिवजयंती, अक्षय्यतृतीया, नृसिंह जयंती ह्या सण उत्सवाचा, थंडीचे दिवस संपले की आगमन होते. ऋतुराज वसंताचे! खऱ्या अर्थाने वसंतऋतू हा सर्व ऋतूंचा राजा. पण हा राजा काही काळ आपला 'राजेपणा' बाजूला ठेवतो आणि आपल्या चैतन्यमय खेळात निसर्ग देवतेला सामील करून घेतो. हे कौतुक पाहावयास सहस्त्ररश्मीही आकाशात उशिरापर्यंत रेंगाळू लागतो. कोकिळेसारख्या अग्रदूताबरोबरच पीलक, गोविंद, तांबट, बुलबुल आणि इतर सारे पक्षीगण ऋतूराजाच्या स्वागताला सामोरे जातात. ऋतूंचे चक्र फिरत असताना पायाखालची भूमि आणि डोक्यावरचे आकाशही नवनव्या रंग तरंगाची उधळण करते. आंब्यांच्या झाडांवर फुललेल्या मोहराचा सुगंध हळूच कुजबुजतो - शिशिर संपला. उठा आणि वसंताचे स्वागत करा. काजू, शेवगा यावर फुललेली नाजूक फुले फळांच्या आगमनाची | सुवार्ता देतात. शिरीषाची झाडे जांभळट गुलाबी व नाजूक फुलांच्या शृंगाराने नटतात. जाई, जुई, सायली, मोगरा, चंपक ही सारी सुगंधी मंडळी ऋतुराज वसंताची संध्याकाळ सुगंधमय करतात. पाहतापाहता सारा परिसर बदलतो. कुण्या जादूगाराने आपली जादूची कांडी फिरविली की काय असे भासते. या किमयेने कविमनालादेखील भुरळ घातलेली असते. 'आला हा वसंत फेरीवाला' म्हणून कुणी कवी त्याला साद घालतो, तर कुणाला हा पाहुणा प्रत्यक्ष 'अनंग देवाचा प्रेषित' च भासतो. वसंताच्या आगमनाने हर्षित झालेला निसर्ग रंग, रूप, गंध यांची पूजा मांडतो. निसर्गाच्या अंग-प्रत्यंगातून, वृक्षलतांच्या पानाफुलातून, नद्या-नाल्यांच्या संथ नादमय वाटचालीतून, पाखरांच्या मधुर किलबिलाटातून हे चैतन्य प्रत्ययास येते. आनंद उत्कटता, काव्य, संगीत आणि सौदर्यं यांचा एक अपूर्व सोहळा वसंत ऋतूत पाहावयास मिळतो. अशा या निसर्गाला नटवणाऱ्या, फुलवणाऱ्या आणि मने उल्हासित करणाऱ्या वसंत ऋतूंचे 'ऋतूराज' हे विशेषण खरोखरच सार्थ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा