Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

महात्मा जोतीबा फुले

 महात्मा जोतीबा फुले 


       माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, अखंड अविरतपणे फिरणाऱ्या काळाच्या चक्रावरील एखादे शतक इतके महान असते की,त्या शतकाला एखाद्या युगप्रवर्तक महात्म्याचे स्वप्न पडते आणि ते साकारही होते. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धाला असेच एक स्वप्न पडले आणि ते स्वप्न सत्यातही उतरले. ते स्वप्न केवळ स्वप्नच नव्हते तर ते एक जिवंत चैतन्यच होते. ते चैतन्य म्हणजे दलितांचे व उपेक्षितांचे कैवारी, स्त्रियांचे उद्धारकर्ते 'महात्मा जोतीबा फुले' होय. "सत्याचा पालनवाला । तो धन्य ज्योतिबा झाला । पतितांचा पालनवाला । तो धन्य महात्मा झाला ॥" 

महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी चिमणाबाई व गोविंदराव यांच्या पोटी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी एका सामान्य अशिक्षित माळी कुटुंबात झाला. लहानपणी त्यांच्या जीवनात क्रांतीची ठिणगी पेटविणारा एक प्रसंग घडला. त्यांच्या एका ब्राह्मण मित्राचे लग्न होते. आग्रहाचे निमंत्रण असल्यामुळे जोतीबा त्या लग्नसमारंभात सहभागी झाले. परंतु तेथे क्षुद्र म्हणून त्यांचा अपमान केला व त्यांना मिरवणुकीतून बाहेर काढले. आतापर्यंत आयुष्यात सामान्य ज्योतीप्रमाणे संथपणे तेवत असलेली ही ज्योत अपमानाने विझली नाही तर उलट तिचे क्रांतिज्योतीत रुपांतर झाले. त्यावेळी समाजामध्ये शुद्रातिशुद्रांना मिळणारी वागणूक, स्त्रियांची स्थिती, हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती इ. गोष्टीचे जोतीबांनी अवलोकन केले. हजारो वर्षे अमान आणि दारिद्र्याच्या खाईत निद्रिस्त अवस्थेत पडलेल्या दीन-दलितांच्या जीवनामध्ये कायापालट करायचा असा निर्धार ज्योतीबांनी केला.


         शिक्षण हा सर्व सुधारणांचा मूळ पाया आहे हे त्यांनी ओळखले आणि म्हणूनच त्यांनी १८४८ मध्ये पुण्यात प्रथम मुलींची पहिली शाळा काढली आणि आणि स्री-शिक्षणाची घंटा घणघण वाजवली. हजारो वर्षाच्या रुढीवर आघात केला तो घंटानाद ऐकून बहुजन समाज खडबडून जागा झाला. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगताते उद्धारी। ही महात्मा फुल्यांची भावना सामान्य माणसांपर्यंत पोहोचली. फुल्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी त्या शाळेमध्ये स्वत: स्र शिक्षिका म्हणून कार्य सुरू केले. ज्योतीबा आणि सावित्रीबाई यांच्या या कार्यामुळे पुण्यातला सर्व वर्ग खवळून उठला. त्यांनी ज्योतीबा आणि सावित्री यांच्या अंगावर दगड, चिखल फेकले. परंतु, आले जरी कष्ट दशा अपार । न टाकिती धैर्य तथापि थोर ।। या न्यायाने ते खचले नाहीत. अस्पृश्यांसाठी स्वत:च्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद खुला करून फुल्यांनी स्वत:पासून परिवर्तनाच्या कृतीला सुरुवात केली. म्हणूनच ज्योतीबा हे केवळ शाब्दिक पंडित नव्हते तर ते एक खंदे कृतिवीर होते   'सत्यशोधक समाजा'च्या माध्यमातून अनिष्ठ रुढींना विरोध करणारे समाजसुधारक होते. त्या काळात ब्रिटिश सरकारकडे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी करणारे ज्योतीबा हे दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ व समाजहितचिंतक होते. महात्मा फुले धर्मशास्त्रीमहात्मा फुले धर्मशास्त्री नसतील पण आत्मज्ञानी निश्चितच होते. 'गुलामगिरी', शेतक-यांचा आसूड', 'ब्राह्मणांचे कसब' ही त्यांची साहित्य-संपदा पाहिली की फुल्यांमधील वास्तवाचे प्रखर चित्रण करणारा साहित्यिक आपल्याला समजतो. फुल्यांच्या रुपाने जणू या भूमीवर सत्य अवतरले आणि त्याने असत्याशी झुंज दिली. सत्य हा त्यांचा देव आणि सेवा हा त्यांचा खरा धर्म होता. ज्या समाजाने फुले दांपत्याला शेण, दडग फेकून मारले त्या समाजासाठीच या दांपत्याने ज्ञानफुले, क्रांतिफुले अर्पण केली. समाजसेवेच्या खडतर मार्गावरून चालताना या समाजावर अनंत उपकार केले. आणि या समाजासाठीच स्वत:चे जीवनपुष्प अर्पण केले. 


         आजही या समाजाला अनेक ज्योतीरावांची आणि त्यांनी पेटविलेल्या ज्योतींची आवश्यकता आहे म्हणून शेवटी एवढेच म्हणन. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पाहा जरा । आपण त्यांच्या समान व्हावे, हाच सापडे बोध खरा . जय हिंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा