Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

माणसात देव शोधणारा संत गाडगे बाबा

 माणसात देव शोधणारा संत गाडगे बाबा



माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, 


देव नाही दगडात, देव नाही दगडात। 


देव दाखविला तुम्ही, माणसाच्या हृदयात ।।" 


स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचे साम्राज्य पसरलेले होते. साधेभोळे, अज्ञानी लोक देवळातील दगडाच्या देवाच्या मागे लागले होते. अशा वेळी या सामान्य माणसांना मनुष्याच्या हृदयातील देवाची ओळख करून देणाऱ्या महान संताचा जन्म महाराष्ट्रात झाला. असा हा माणसातील देव शोधणारा संत म्हणजे गाडगेबाबा होय. विदर्भातील शेणगावी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी बाबांचा जन्म झाला. त्यावेळी समाजावर अन्याय अत्याचाराचे डोंगर रचले जात होते. त्यातून दुःखाच्या नद्या वाहत होत्या. अंधश्रद्धेचे थैमान माजले होते. मुक्या प्राण्यांचे बळी दिले जात होते. रक्ताचे पाट वाहत होते. माणसांचा चिखल होत होता. सावकार गरिबांच्या गळ्यात फास आवळत होते. हे सारे काही बाबांनी जवळून पाहिले. त्यांना ते सहन झाले नाही. अखेर त्यांनी घराचा, संसाराचा त्याग केला आणि परिश्रमाचे व्रत स्वीकारले. 


सोडून सर्व घरदार, तोडिले पाश मायेचे ॥ अनवाणी फिरून पायी, अश्रू पुसले बहुजनांचेडोक्यावर झिंज्या, अंगावर चिंध्या, एका हाती फुटके गाडगे, एका हाती खराटा, फुटक्या मडक्याच्या खापराचे भोजनपात्र असा बाबांचा वेश होता.


ज्या गावात बाबा जात ते गाव हातातील खराट्याने स्वच्छ करत व संध्याकाळी गावातील लोकांच्या मनातील घाण कीर्तनाच्या माध्यमातून स्वच्छ करत.


 हाती घेऊन खराटा । 


अवघ्या झाडिल्या रे वाटा ।


 पुराणातील भाकडकथा बाबांनी कीर्तनात कधीच सांगितल्या नाहीत. बाबांचे कीर्तन म्हणजे सर्वसामान्य माणसांना जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ होता.


 "अडाणी राहू नका, पोरांना शाळेत पाठवा, सावकाराचे कर्ज काढू नका, मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नका.


 दगडाच्या देवाची पूजा करू नका.


 देव दगडात नाही, 


अरे देव तर माणसांच्या हृदयात आहे." 


बाबांचा हा उपदेश सामान्यांच्या जीवनाला दिशा देणारा होता. माणसाच्या हृदयातील देव शोधून दाखवणाऱ्या या संताने अंधश्रद्धेला प्रखर विरोध केला. अनेक प्रसंगी स्वत: पुढाकार घेऊन सामान्य माणसांना अंधश्रद्धेपासून परावृत्त करण्याचे काम गाडगेबाबांनी केले. 


तहानभुकेची पर्वा न करता बहुजन समाजाची दुःखी स्थिती पाहात, त्यांचे दुःख आपल्या हातांनी पुसण्यासाठी अनवाणी पायांनी बाबा वणवण भटकत राहिले. हातातील गाडग्यामुळे लोक त्यांना गाडगेबाबा म्हणत. एखाद्या गावात अंगावरील चिंध्यांमुळे चिंधेबाबा म्हणत तर विदर्भ व मराठवाड्यात वट्टीबाबा म्हणत. पण खऱ्या अर्थाने ते होते रंजल्या गांजलेल्यांचे बाबा होते. 


संत गाडगेबाबा म्हणजे मानवतेचे पुजारी. माणसातील देव शोधणारे खरे संत आणि वीर बुद्धिवंत होते. मानवाची पूजा करणाऱ्या या थोर संताकडे पाहिले की, संत तुकारामांच्यात अभंगाची आठवण होते - 


"जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले । 


तोचि साधू ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।" 


जय हिंद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा