स्वातंत्र्यवीर सावरकर
माननीय अध्यक्ष, महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, भारतया आधुनिक इतिहासातील एक सुवर्णपान म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागेल असे महामानव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर!
जाज्वल्य देशभक्तीबरोबरच प्रगल्भ प्रतिभाशक्ती, प्रेरक वक्तृत्व, तत्वनिष्ठ राजकारण, धर्माभिमान व विज्ञानवादी समाजसुधारक अशा अनेक गुणांचा समुच्चय असलेले सावरकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. देशासाठी क्रांतीची पताका खांद्यावर घेऊन ब्रिटिशांच्या छातीवर थयथय नाचणार्या या क्रांतिकारकाचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर' गावी झाला. इ.स. १८९८ साली इंग्रजांनी चाफेकर बंधूंना फाशी दिली. चाफेकरांच्या बलिदानाने सावरकरांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच, त्यांनी 'मित्रमेळा' ही संघटना स्थापन केली. तिचेच पुढे 'अभिनव भारत' या क्रांतिकारी संघटनेत रुपांतर झाले. त्यांनी केलेल्या सरकारविरोधी घडामोडीमुळे बॅरिस्टर होऊनही ब्रिटिश सरकारने त्यांना पदवी देण्याचे नाकारले. देशसेवेपुढे पदवीचे भेंडोळे त्याज्य मानून बॅरिस्टर झालेला हा माणूस देशाला स्वातंत्र्याकडे नेणारी पायवाट तडवत राहिला.
परदेशातून भारतीय क्रांतिवीरांना पिस्तुले आणि शस्त्रास्त्रांची माहिती पुरविण्याचे काम सावरकरांनी केले. स्वातंत्र्य चळवळीतील सक्रीय सहभागामुळे इंग्रज सरकारने त्यांना दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावली. बंदिवासातल्या अंधाऱ्या भिंतीवरही आपल्या प्रतिभेच्या प्रकाशाने महाकाव्य रेखाटणारा एकमेव महाकवी म्हणजे सावरकर होय!
सावरकरांनी लिहिलेले '१८५७ चे स्वातंत्र्यसमर', 'सहा सोनेरी पाने', 'माझी जन्मठेप' हे ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यविश्वाला मिळालेली महान देणगीच आहे. सावरकरांचे ''ने मजसी परत मातृभूमीला' हे आर्त गीत व 'जयोस्तुते' हे स्वातंत्र्यदेवीचे स्तोत्र आजही प्रत्येक भारतीयाला देशभक्तीची प्रेरणा देत आहे. धार्मिक बाबींना वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देणारे सावरकर हे एक द्रष्टे समाजसुधारक होते. अशाप्रकारे सावरकरांचे चरित्र म्हणजे इतिहासातील एक दीपस्तंभ आहे.
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा