नेताजी सुभाषचंद्र बोस
महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांच्या वडिलांच्या इच्छेखातर आय.सी.एस. होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. १९२० साली ते चौथ्या क्रमांकाने आय.सी.एस. परीक्षा पास झाले. १९२१ मध्ये ते भारतात परतले तेव्हा त्यांचे वय होते अवघे तेवीस वर्षे. अत्यंत कमी वयात आय.सी.एस. परीक्षा पास झाल्याने सरकारच्या सनदी सेवेतील उच्चपदस्थ नोकरी त्यांच्या घरी चालून आली होती. परंतु भारतीयांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या ब्रिटिश सरकारच्या पदरी नोकरी करण्यापेक्षा 'माझ्या भारतभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करीन' असा निर्धार या तेजस्वी राष्ट्रवीराने केला.
संपत्ती, प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या सनदीनोकरीला लाथ मारून हा तरुण राष्ट्रसेवेची वाट चालू लागला. या वाटचालीत त्यांना आठ वेळा तुरुंगवास झाला. इ.स. १९३८ व १९३९ च्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्षपद सुभाषबाबूंनी भूषविले. राष्ट्रीय काँग्रेसमधील मवाळ नेत्यांशी मतभेद झाल्याने त्यांनी 'फॉरवर्ड ब्लॉक' हा स्वतंत्र पक्ष काढला. सन १९४९ मध्ये ते भारतातून गुप्तपणे जर्मनीला गेले. तेथे जपान, ब्रह्मदेश, मलेशिया या देशांच्या मदतीने त्यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले.
आझाद हिंद सेना उभारून 'चलो दिल्ली, जयहिंद' अशा घोषणा दिल्या. आझाद हिंद रेडिओ केंद्र स्थापन करून त्याद्वारे आझाद हिंद सेनेच्या कार्याची माहिती जनतेला देत लोकांमध्ये स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. जपानच्या मदतीने १९४३ मध्ये त्यांनी ब्रिटिश मित्रराष्ट्राविरुद्ध सशस्त्र संघर्षाची घोषणा केली. आझाद हिंद सेनेने आपल्या तुटपुंज्या बळाने कडवी झुंज दिली. पुढे दोस्त राष्ट्रांकडून जपानचा पराभव झाला.
जपानकडून मदत मिळेनाशी झाली आणि आझाद हिंद सेनेचाही पराभव झाला. परदेशात जावून इंग्लंड, अमेरिका यासारख्या बलाढ्य सत्तांशी त्यांच्याच शत्रूंची मदत घेऊन नेताजींनी केलेला संघर्ष असामान्य होता. त्यांचे कार्य जरी असफल झाले तरी त्यांच्या ज्वलंत क्रांतिकारी विचारांनी अनेकांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली.
१८ ऑगस्ट १९४५ मध्ये एका विमान अपघात नेताजींचा दुर्दैवी अंत झाला. स्वातंत्र्यासाठी धगधगणारी एक तेजस्वी क्रांतीज्वाला शांत झाली. अखेरच्या श्वासापर्यंत हा स्वातंत्र्य सेनानी भारत मातेच्या स्वातंत्र्याची काळजी वाहत राहिला. त्यांच्या त्या अतुलनीय शौर्याला त्रिवार अभिवादन!
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा