Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १९ जानेवारी, २०२२

महाराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव चव्हाण

  महाराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव चव्हाण



      माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, शाहू, फुले, आंबेडकरांनी या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचे वरदान दिले. तीच विचारधारा खांद्यावर घेऊन आणि महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न डोळ्यांमध्ये साठवून यशवंतराव चव्हाणांनी संपूर्ण आयुष्याची पायवाट तुडवली. सामान्यांतून असामान्यत्वापर्यंत एका प्रेरणेचा प्रवास म्हणजे यशवंतरावांचे जीवनचरित्र! १२ मार्च, १९१३ रोजी 'देवराष्ट्रे' या छोटयाशा खेड्यात यशवंतरावांचा जन्म झाला. वडिलांचे नाव बळवंतराव व आईचे नाव विठाबाई होते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी यशवंतरावांचे पितृछत्र हरपले आणि तेथून पुढे त्यांची आई हीच त्यांच्या जीवनाचा आधारवड झाली. 


          क-हाड-साताऱ्याच्या काळ्या मातीवर आणि कृष्णा-कोयनेच्या काठावर यशवंतरावांची जडणघडण झाली. एकदा वर्गात गुरुजींनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारले, " तू कोण होणार?" कोणी नेता होणार, कोणी खेळाडू होणार, कोणी साहेब होणार अशी उत्तरे दिली. परंतु यशवंतराव चव्हाणांनी गुरुजींना उत्तर दिले, "मी यशवंत चव्हाण आहे, मी यशवंतराव चव्हाण होणार" गुरुजींनाही आश्चर्य वाटले. प्रचंड आत्मविश्वास आणि स्वप्रयत्नातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व फुलविण्याचा ध्यास त्यांच्या या उद्गारातून जाणवतो. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनावर, म. फुले, कार्ल मार्क्स, आंबेडकर, पंडित नेहरू, म. गांधी, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराचे संस्करण झाले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता.   

स्वातंत्र्यानंतर १९५२ च्या सार्व्रिक निवडणुकांमध्ये त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला. मुंबई राज्य ग्रामपंचायतीची स्थापना करून स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवले. अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी, या प्रश्नाकडे केवळ तात्विक अंगाने न पाहता सर्व बाजूंनी विचार केला पाहिजे अशी अचल भूमिका त्यांनी घेतली होती. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या आंदोलनात ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले. त्याच ठिकाणी त्यांचे भव्य स्मारक उभारले गेले. १ मे, १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रातील जातिभेद नष्ट होऊन बहुजन समाज उभा राहिला पाहिजे, अवघा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे हे यशवंतरावांचे स्वप्न होते आणि म्हणूनच शिक्षण, राजकारण, प्रशासन, उद्योग, तंत्रज्ञान, समाजकारण या गोष्टी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातील पिंपळपारापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचे दुःखाश्रू जणू यशवंतरावांच्या पापण्यांखाली दडलेले होते म्हणूनच त्यांनी कृषी विकासाला अग्रक्रम दिला. विकासासाठी सहकाराची गंगा खेड्यापाड्यापर्यंत नेली. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा पंडित नेहरूंनी देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची धुरा पेलण्यासाठी यशवंतरावांना मुंबईहून दिल्लीला बोलावले जणू हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला! 'गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेली व्यक्ती आपल्या कार्यकर्तृत्वाने देशाच्या उपपंतप्रधान पदापर्यंत पोहोचते' हा आदर्शपाठ आजही महाराष्ट्राला तेजाचा प्रकाश देतो आहे. यशवंतराव चव्हाण हा केवळ एक जीवनप्रवास नाही तर तो होता एका ध्येयनिष्ठ जिद्दीचा प्रवास आणि असामान्य कर्तृत्वाचा देदीप्यमान इतिहास आहे. म्हणूनच, महाराष्ट्राचे शिल्पकार हे महाराष्ट्राच्या इतिहासाचे पहिले पान आहे. अन् यशवंतराव चव्हाण या नावाला देशाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. जय हिंद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा