उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे - श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारही येतातच .
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे- येते वेळी ताठ मानेने यावे आणि जाते वेळी खाली मान घालून जाणे .
ऊसाच्या पोटी कापुस -
सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती.
ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये .
कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
एका माळेचे मणी -
सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे .
एका हाताने टाळी वाजत नाही- दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही .
एक ना घड भाराभर चिंध्या
एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.
ऐकावे जनाचे करावे मनाचे.
लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे .
एकाची जळती दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी-
दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये -
दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.
एका पिसाने मोर (होत नाही) थोड्याशा यशाने हुरळून जाणे.
एका खांबावर द्वारका
एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.
एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य.
एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत .
दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत.
ऐंशी तेथे पंचायशी
अतिशय उधळेपणाची कृती.
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार
मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच असतात.
ओळखीचा चोर जिवे न सोडी - ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
ओठ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो /शेंडी तुटो की तारंबी तुटो कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे.
ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे? - सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे.
औट घटकेचे
अल्पकाळ टिकणारी गोष्ट.
करावे तसे भरावे
जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे.
कर नाही त्याला डर कशाला ? - ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे?
करीन ते पूर्व - मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.
करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते.
काही गोष्टी केल्यातरी नुकसान होते नाही केल्यातरी नुकसान होते.
करून करून भागला, देवध्यानी लागला
भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे.
कणगीत दाणा तर भील उताणा गरजेपुरते जवळ असले, की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत.
कधी तुपाशी तर कधी उपाशी - सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही.
कशात काय नि फाटक्यात पाय- वाईटात आणखी वाईट घडणे.
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही.
काडीचोर तो माडीचोर.
एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे.
काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती
क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्या पुरताच असतो.
का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढ -
निरर्थक गोष्टींची काळजी करणे.
कानात बुगडी, गावात फुगडी
आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.
काल मेला आणि आज पितर झाला- अतिशय उतावळे पणाची वृत्ती.
काकडीची चोरी फाशीची शिक्षा अपराध खूप लहान; पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.
काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही जे काम भरपूर पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते.
कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते पूर्वग्रह दुषीत दृष्टी असणे.
काशीत मल्हारी महात्म्य -नको तेथे नको ती गोष्ट करणे.
कानामागून आली अन् तिखट झाली - श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.
कामापुरता मामा
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.
कावळा बसला अन् फांदी तुटली परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे.
काखेत कळसा गावाला वळसा - जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे.
काप गेले नि भोके राहिली वैभव गेले अन् फक्त त्याच्या खुणा राहिल्या.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नहीं. क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
काळ आला; पण वेळ आली नव्हती नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मुर्खपणा करणे,
कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा
दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे
मूळचा स्वभाव बदलत नाही.
कुडी तशी फोडी देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.
कुह्राडीचा दांडा गोतास काळ - स्वार्थासाठी केवळ दुष्टबुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
केळीला नारळी आणि घर चंद्रमौळी अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.
केस उपटल्याने का मढे हलके होते ? - जेथे मोठ्या उपयांची गरज असते तेथे छोट्या उपयांनी काही होत नाही.
केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले.
एखाद्या गोष्टीचा लाभ घेतांना गंमत वाटते, मात्र पैसे देतांना जीव मेटाकुटीस येतो.
कोळसा उगाळावा तितका काळाच वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.
कोल्हा काकडीला राजी क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनीही खूष होतात.
कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी.
चूक एका शिक्षा दुसऱ्यालाच.
कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभट्टाची तट्टाणी. महान गोष्टींबरोबर क्षुद्राची तुलना करणे.
खऱ्याला मरण नाही
खरे कधीच लपत नाही.
खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते-
खर्च करणाऱ्याचा खर्च होतो, तो त्याला मान्यही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो.
खाऊ जाणे तो पचवू जाणे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
खाण तशी माती आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे.
खायला काळ भईला भार
निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.
खाई त्याला खवखवे
जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
खाऊन माजावे टाकून माजू नये पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये.
खोटघाच्या कपाळी गोटा
खोटेपणा, वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते.
गरज सरो, वैद्य मरो
एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे.
गळ्यात पडले झोंड हसून केले गोड गळ्यात पडल्यावर वाईट गोष्ट सुद्धा गोड मानून घ्यावी लागते.
गची बाधा झाली गर्व चढणे.
गरजेल तो पडेल काय
केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही.
गरजवंताला अक्कल नसते.
गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते.
गर्वाचे घर खाली-
गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.
गळ्यातले तुटले ओटीत पडले नुकसान होता होता टळणे.
गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.
गाढवाला गुळाची चव काय ?
ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.
गावंढ्या गावात गाढवीण सवाशीण जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते.
गाढवाच्या पाठीवर गोणी
एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही; तर तिचा फायदा घेता यायला हवा.
गाढवाने शेत खाल्ले, ना पाप, ना पुण्य अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायाच जाते.
गाव करी ते राव ना करी
श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा