हुतात्म्याचे मनोगत
देशासाठी मी हुतात्मा झालो याचा मला अभिमान वाटतो. माझा देश पारतंत्र होता. आम्हाला स्वराज्य हवे म्हणून साम्राज्यवाद्यांना आम्ही परोपरीने सांगितले होते पण आ सहनशील आहोत म्हणजे दुर्बल आहोत, असा त्यांनी समज करून घेतला होता. हा त्यांचा सम आम्हाला दूर करायचा होता.
शिवाय माझ्या देशात पारतंत्र्यातच सुख मानणारेही अनेक लोक होते. त्यांच्या हृदयात आम्हाला स्वातंत्र्यज्योत चेतवायची होती. यासाठी आम्हाला बलिदान देणे आवश्यक होते. साम्राज्यशाहीला हादरा देणे आणि स्वदेशवासियांच्या मनात स्वातंत्र्याची अभिलाषा व पारतंत्र्याविषयी तिरस्कार निर्माण करणे असे दुहेरी कार्य आम्हाला करायचे होते. म्हणून आम्ही सशस्त्र क्रांतिकारक बनलो.
पण माझ्या देशाला फितुरीचा भयानक शाप आहे. माझी, माझ्या देशाची, माझ्या रक्ताची माणसे फितूर झाली आणि त्यांनी आमची नावे इंग्रज सरकारला कळवली. आम्ही पकडलो गेलो. आम्हाला फाशीची शिक्षा झाली.
आम्ही देशभक्ती केली होती, इंग्रजांनी तिला राजद्रोह नाव ठेवले होते. पण तुरुंगातही आम्ही क्रांतीचाच जयजयकार करत होतो. आमच्या हातांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला. गळ्यांनी तिच्या कीर्तीचे गुणगान केले. तिच्या पावलांची पूजा केली. आमच्या देहाचे तिच्यासाठी समर्पण केले. याचा परिणाम म्हणून आमच्या हातात बेड्या पडल्या, पायात पोलादी शृंखला पडल्या. गळ्यात फासाचा दोर अडकला. फाशीची शिक्षा हसतहसत स्वीकारण्यासाठी आम्ही छाती पुढे केली.
कारण आमचा आवेश अभंग होता. आम्ही जाणूनबुजून सतीचे वाण स्वीकारले होते. स्वातंत्र्याच्या ध्येयापायी आम्ही बेहोश झालो होतो. आम्ही ना मागे पाहिले ना विश्रांतीसाठी थांबलो, ना प्रेम, कीर्ती, संसार यांचे धागे आमच्या ध्येयापासून आम्हाला दूर करू शकले. आम्हाला दिसत होता फक्त एकच तारा स्वातंत्र्याचा!
आणि एक दिवस मला भेटायला माझी आई आली. तिच्या डोळ्यात आसवे होती. मी म्हणालो, 'आई, तू शोक करू नकोस. कारण मृत्यू हा केव्हातरी येणारच आहे. पण आपला देश पारतंत्र्यात असूनही त्याच्या स्वातंत्र्याकरिता जो लढत नाही त्याच्या जगण्यालाही अर्थ नाही आणि मृत्यूलाही अर्थ नाही. त्यालाही मृत्यू येतोच पण स्वर्ग मिळत नाही. उलट देशाच्या स्वातंत्र्याकरिता लढता लढता ज्याला वीराचे मरण प्राप्त होते त्याला स्वर्गलोक प्राप्त होतो. त्याच्या जीवनाचे आणि मृत्यूचेही सार्थक होते.'
मी आईची समजूत घालताना म्हटले, “स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे." हे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जो बलिदान देतो त्याचा वास्तविक आदर व्हायला हवा पण पारतंत्र्यात असे होत नाही. उलट त्याला फासावर चढावे लागते. असे कितीतरी दुर्दैवी प्राणी असतील की जे अपराधावाचून मेले असतील. पारतंत्र्यात माणसाला अन्यायच मिळतो.
आई तु शेक करू नकोस. या शरीराला कुणी आसवांची आंघोळ घाला की प्रेमाची उटी लावा म्हणजे मातीचा पुतळा असल्यामुळे शेवटी ही माती मातीलाच मिळून जाणार.देह नश्वर आहे म्हणून तुला आक्रोश करण्याचे काही एक कारण नाही. खरे तर तुझ्याच पोटी पुनर्जन्म घेऊन मी तुला नऊ महिन्यांनी भेटणार आहे.'
आणि दुसऱ्या आईला, मातृभूमीला निरोप दिला, की तू रडू नकोस. पारतंत्र्याच्या दुःखाने अश्रू ढाळू नकोस. तुझा लवकरच भाग्योदय होणार आहे कारण अंधाराच्या पोटात पहाटेचा प्रकाश असतो. 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल!' आज आमची चिता रचली आहे, त्यात आमची राख होणार आहे. पण त्या राखेतून, फिनिक्स पक्ष्यांप्रमाणे, उद्याचे क्रांतिवीर निर्माण होणार आहेत. ते भावी क्रांतीचे नेते तुझ्या पायातील पोलादी बेड्या खळखळा तोडून टाकणार आहेत.
मग आम्ही फासावर जात असतानाही 'वंदे मातरम्' चा जयघोष केला. आनंदाने मृत्यूचे चुंबन घेतले. मृत्यूनेही आमचे स्वागत केले, कारण आम्ही ‘मृत्युंजय' झालो होतो !
आमचे बलिदान वाया गेले नाही, मातृभूमी मुक्त झाली, यात आमच्या मरणवेदनाही आम्ही विसरून गेलो आहोत. येतो भरुन ऊर होतात सूर वेडे हे माय मातृभूमी गातो तुझे पवाडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा