Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

मेणबत्तीचे आत्मवृत्त

                                मेणबत्तीचे आत्मवृत्त 





वाढदिवस साजरे होतात आम्हाला नि विझायचे का वाढदिवस होतात? मेणबत्यांना वाढदिवसच नसतात।

           जे पिकतात ते उपाशी राहतात, जे विकतात ते मात्र तुपाशी खातात ही दुनियेची रीतच आहे. असं असलं तरी मेणबत्तीच्याही जीवनाला काही अर्थ आणि तिच्या विझण्यालाही काही मोल आहे. हे माझे अनुभवाचे बोल आहेत कारण मी एक मेणबत्ती आहे. 

                    माझी एक बहीण होती. इतरांसाठी जळायचं नाही असं ठरवून जगणारी. ती आमच्या घराच्या फळीवर जाऊन बसली. कुणाचं लक्ष तिच्याकडे जाईना, चैनीत जीवन जगत होती. एक दिवस आमच्या घरातल्या एका छोट्या मुलीचा वाढदिवस संपन्न व्हायचा होता. घर सुशोभित झाले. फुलापानांची तोरणे लागली. घराची झाडझूड झाली. माझी बहीण घरच्यांच्या हाती लागते की काय म्हणून मी उत्सुकतेनं आणि भयभीत नजरेने तिच्याकडे पाहलं. ती घरच्यांच्या हाती लागली नव्हती पण झाडूच्या प्रहारानं जमिनीवर कोसळली होती. पाहते, तो तिला किड्यामुंग्यांनी कुरतडून टाकले होते. आता ती इतरांना प्रकाशही देऊ शकत नव्हती आणि स्वतःसाठीही धड जगू शकत नव्हती उलट माझ्यावर झाडूचे प्रहार तर झालेच नव्हते. पण कोमल हातांनी मला अलगद उचलून एका सजवलेल्या केकवर बसवण्यात आले होते. थोड्याच वेळात इतरांना मंद सुखकर प्रकाश देत देत माझी जीवन ज्योत जळणार होती. 

                   कुणाचे आयुष्य मोलाचे, समाधानाचे, आनंदाचे, माझं की माझ्या बहिणीचं? माझ्या मनात विचार आला. माझी बहीण कुजत कुजत मरण पावणार, इतरांना आपला उपयोग झाला नाही म्हणून दुःखी असणार. पण माझ्या जीवनाचे मात्र सार्थक होईल. शेवटच्या घटकेपर्यंत आपण साऱ्यांना प्रकाश दिला या सुखदायी तंद्रीत आपलं आयुष्य संपून जाईल.

                  मग मला या घरी केव्हातरी आलेली दोन माणसं आठवली. एक माणूस खूप श्रीमंत होता पण आला तेव्हा त्याचा चेहरा चितेने काळवंडून गेलेला होता. त्याच्यावर इन्कमटॅक्सची घाड पडली होती. ते प्रकरण निस्तरता निस्तरता त्याला भूकही लागेनाशी झाली होती. रात्र रात्र विचार करताना त्याची झोपही उडली होती. त्यातच त्याच्याकडे चोरी झाली. सोने नाणे लॉकरमध्ये होते म्हणून बीस लाख रुपयांचे सोने वाचले होते. पण पन्नास हजारांची कॅश चोरांनी पळवून नेली होती. पण त्या पन्नास हजारांसाठीही जणू त्याने हाय खाल्ली होती, तो दुःखी झाला होता. मला जाणवलं की तो इतरांसाठी नव्हे तर केवळ स्वतःसाठी जगत होता म्हणूनच दुःखी होता. याउलट एकदा आलेला तो हाडकुळा माणूस. त्याचे कपडेही जेमतेमच होते आणि दाढीही बोटभर वाढलेली होती. तरी तो खूप आनंदात होता कारण त्यानं सुरु केलेली एक चळवळ आता जोर धरु लागली होती. चळवळीतून तो लोकहित साधत होता. मनात विचार आला, 'स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास. 'अनंत काणेकरांनी 'दोन मेणबत्या' या लघुनिबंधात नेमका हाच विचार मांडला आहे.. 

                      एकदा घरातली वीज गेली होती. एकदम भयाण काळोख पसरला. कुठं काही दिसेना. तेवढ्यात कुणीतरी मला अग्निज्योत दिली. मी स्वतः क्षणाक्षणानं आणि कणाकणानं झिजत जळत घराला उजाळा देऊ लागले. मी प्रकाश देताच मुलांच्या मनातली भीती दूर झाली. ती टाळ्या वाजवून बागडू लागली. माझ्या प्रकाशात खेळू लागली. 

                     रवींद्रनाथ टागोरांची कविता मला आठवली. सूर्य मावळतीला आला. आपण मावळल्यावर पृथ्वीला प्रकाश कोण देईल याचा तो विचार करू लागला. वणवा, तारे, चंद्र, इंद्रधनुष्य, झाडे,टेकड्या सर्वांना त्यानं विचारलं, पण पृथ्वीला प्रकाश दयायला कुणीही पुढं येईना. तेवढ्यात एक लहानशी पणती पुढं आली आणि विनम्रपणे म्हणाली 'भगवन्! तुमच्याएवढा नव्हे तरी जमेल तेवढा प्रकाश मी देईन साऱ्या मानवजातीचा नसेल पण एखादया कुटुंबाचा तरी अंधार मी दूर करेन.' महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती यांनी हेच केलं. संतानीही हे केलं... सारे समाजसुधारक म्हणजे समाजासाठी जळणाऱ्या व विझणाऱ्या मेणबत्याच नव्हे का? हेच आम्हा मेणबत्तीचं जीवितकार्य आहे. म्हणून माझ्या जीवनाचा आणि मृत्यूचाही मला अभिमान वाटतो. देवाच्या चरणी पडून पवित्र झालेल्या निर्माल्याहून मला माझे जीवन श्रेष्ठ वाटते कारण दगडी देवाची नव्हे तर आम्ही चालत्या बोलत्या मानवाची सेवा करत असतो. निर्माल्य पवित्र .. खरे पण ते देवरुप होत नसते. आम्ही मात्र आमचे सारे अस्तित्वच मानवाला वाहून निःशेष होत असतो.

                 इतरांना प्रकाश देण्यासाठी जीवनसर्वस्वाचे समर्पण करणारी मी भाग्यवती आहे. वाटतं, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा