→ प्रार्थना
ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम....
→ श्लोक
-पाशांकुशधरे देवी वीणापुस्तकधारिणी । मम वक्त्रे वसेन्नित्यं दुग्धकुंदसुनिर्मले ।
-पाश आणि अंकुश धारण करणाऱ्या, हाती वीणा व पुस्तक असलेल्या आणि दूध व कुंद यांच्याप्रमाणे निर्मळ असा धवल वर्ण असलेल्या हे देवी शारदे, माझ्या मुखात तुझा नित्य वास असू दे.
→ चिंतन
विद्या ही अमर्याद आहे. कितीही घेतली तरी संपत नाही. म्हणून प्रत्येकाने जन्मभर विद्यार्थी राहिले पाहिजे. - ह. ना. आपटे
- विद्याधन हे सर्व धनांत श्रेष्ठ आहे. या धनाचे विशेष म्हणजे ते एक तर अमर्याद आहे. एका जन्मात माणसाला सर्व विद्या हस्तगत करणे अशक्य आहे. पण त्यासाठी माणसाने कायम विद्यार्थी राहायला पाहिजे. तरच तुम्हाला ती मिळविता येईल. काही ठराविक शिक्षण घेतले म्हणजे आयुष्यात सर्व काही मिळाले, असे मानता कामा नये. आपण आयुष्यभर विद्यार्थी राहिलो, तर आपल्याकडे विद्या येतच राहील.
→ कथाकथन
- 'जागतिक लोकसंख्या वाढ इशारा दिन / विस्फोट दिन
-: ११ जुलै १९८७ रोजी जगाची लोकसंख्या ५०० कोटी झाली. तेव्हापासून ११ जुलै हा दिवस लोकसंख्या वाढ इशारा दिन/ विस्फोट दिन म्हणून पाळला जातो. सन २००१ च्या जनगणनेनुसार जगाची लोकसंख्या ६०० कोटींच्या वर, तर राज्याची लोकसंख्या ९ कोटींच्या वर गेली असल्याचे दिसून आले आहे. भारताने स्वातंत्र्योत्तर काळात विविध क्षेत्रांत लक्षणीय प्रगती केली आहे. तरीसुध्दा सर्वसामान्य माणसाचे राहणीमान, जीवनदर्जा म्हणावा इतका उंचावलेला नाही. यास प्रामुख्याने लोकसंख्येत झालेली वाढ कारणीभूत आहे. आज आपल्या देशापुढे अनेक समस्या उभ्या आहेत. त्यांच्या मुळाशी लोकसंख्येची वाढ हे एक प्रमुख कारण आहे. लोकसंख्या वाढीमुळे अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांबरोबरच शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रोजंदारी, नीतिमूल्ये इ. बाबत समस्या निर्माण झाल्या आहेत. देशातील लोकसंख्या या देशाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा घटक आहे. देशातील साधनसामुग्री व सोयी यांच्या प्रमाणात लोकसंख्या असावी लागते. आपल्या देशात लोकसंख्या जास्त व साधनसामग्री मर्यादित, अशी स्थिती आहे. दर दीड सेकंदाला एक मूल जन्माला येते. या हिशेबाने भारतात दर मिनिटाला चाळीस, तासाला २४०० व दिवसाकाठी ५७,६०० आणि वर्षाकाठी २ कोटी १० लक्ष अपत्ये जन्माला येतात. या गतीने लोकसंख्यावाढ होत राहिल्यास भविष्यात अनेक समस्या निर्माण होतील. त्यासाठी लोकसंख्या वाढीमुळे जीवनमानावर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. चांगल्या जीवनमानाकडे वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे आवश्यक आहे. आपले कुटुंब मर्यादित ठेवण्याची जाणीव रुजविणे आवश्यक आहे. लोकसंख्या नियोजनाबरोबरच पर्यावरणविषयक जिव्हाळा, स्त्री-पुरुष समानता, वैज्ञानिकता दृष्टिकोन, ऊर्जेचा योग्य वापर, योग्य वयात विवाह, आहार व आरोग्य आणि जबाबदार पालकत्व अशा विविध दृष्टिकोनांतून, विविध उपक्रमांमधून लोकसंख्या वाढीची जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे अत्यावश्यक आहे. वाढती लोकसंख्या 'टंचाईला आपल्या सोबत घेऊन येते. आज शाळा महाविद्यालये संखेने एवढी वाढूनही शिक्षणसंस्थांत प्रवेश मिळविणे अवघड झाले आहे. शिकलेल्यांना नोकरी मिळत नाही. बेकारीचा प्रश्न आ वासून उभा आहे. मग गुन्हेगारी, व्यसनाधीनता यांना आमंत्रण मिळते. या लोकसंख्यावाढीच्या समस्येवर प्रभावी उपाय तरी काय? केवळ कायद्याने लोकसंख्यावाढ थांबणार नाही. त्यासाठी समाजप्रबोधनातून समाजपरिवर्तन व्हायला हवे. लहान कुटुंबाचे महत्त्व सर्वांना उमगले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला या समस्येचे गांभीर्य समजले पाहिजे. 'लहान कुटुंब, सुखी कुटुंब' हे प्रत्येकाला मनोमनी उमगले, की सर्व समस्यांचे मूळ असलेला हा लोकसंख्यावाढीचा प्रश्न सुलभपणे सुटेल. (पृथ्वीवरील एकूण जमिनीपैकी केवळ २.४ टक्के जमीन भारतात आहे, तर जगातील लोकसंख्येपैकी सुमारे १६ टक्के लोकसंख्या भारतात आहे.)
सुविचार
- • 'लहान कुटुंब, सुखी कुटुंब'
ज्या देशाची लोकसंख्या कमी, तो देश सुशिक्षित व विकसित आहे.
• कोणताही देश, त्या देशातील रहिवाशांनी हालअपेष्टा सोसल्याशिवाय स्वार्थत्याग केल्याशिवाय महत्वपदाला चढलेला नाही. म. गांधी
• व्यक्ती व्हावी कुटुंबपूरक, कुटुंब व्हावे समाजपूरक, तैसेचि ग्राम व्हावे राष्ट्र सहायक, राष्ट्र विश्वशांतिदायी
→ दिनविशेष
• नारायण हरी आपटे यांचा जन्मदिन - १८८९
: हे एक ख्यातनाम मराठी कादंबरीकार होऊन गेले. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील समडोळी गावी झाला. त्यांनी कादंबरी, लघुकथा व निबंध असे विविध प्रकार हाताळले. त्यांनी पस्तीसहून अधिक सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या असून, त्यात तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन, वैवाहिक नीती, संसारसुखाचे मूलभूत सिद्धांत इत्यादींसंबंधी विवेचन केले आहे. प्रभात चित्रपट संस्थेचा 'कुंकू' हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच 'न पटणारी गोष्ट' या कादंबरीवर आधारलेला आहे. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे साठ आहे. 'किर्लोस्कर खबर 'चे ते काही काळ सहसंपादक होते. १५ नोव्हेंबर १९७१ रोजी त्यांचे निधन झाले.
→ मूल्ये
साहित्यप्रेम, जिज्ञासा वृत्ती.
→ अन्य घटना
• मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन १६६७
• जागतिक लोकसंख्या विस्फोट दिन १९८७.
• महान इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख जन्मदिन १९३६
• भारतातील पहिले परमवीरचक्र विजेते मेजर रामा राघोबा राणे यांचे निधन १९९४.
• सर्व जगामध्ये घबराट पसरविणारी अमेरिकेची 'स्कायलॅब' ही अंतराळ प्रयोगशाळा पॅसिफिक महासागरात कोसळली १९७९.
→ उपक्रम
• लोकसंख्या शिक्षणविषयक जाणीव जागृती निर्माण करण्याकरिता विद्याथ्र्यांकडून आजूबाजूच्या समाजाचे निरीक्षण करून अनुभव कथन करायला सांगा. "विद्या विषयक संस्कृत सुभाषिते अर्थासह मुलांना शिकवा.
→ समूहगान
• मंगल देशा पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा !....
सामान्यज्ञान
-जगात प्रत्येक मिनिटाला अंदाजे ९९ बालके जन्माला येतात. जगात प्रत्येक मिनिटात २० विवाह होतात. • १९९१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ७,८७,०६,००० आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा