Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

बुधवार, १२ जुलै, २०२३

13 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ




 प्रार्थना 

: नमस्कार माझा ज्ञानमंदिरा, सत्यम् शिवम् सुंदरा....


श्लोक

 यद्दिव्यं अव्ययं धाम सारस्वतं उपास्महे । यत्प्रसादात विलीयन्ते मोहान्ध समसच्छटा ॥

-मनाला होणारा भ्रम, मनातील अज्ञानरूपी अंधकार आणि त्या अंधकारच्या सर्व छटा जिच्या कृपेने नाहीशा होतात, ज्या दिव्य आणि चिरकालीन अशा सरस्वतीच्या तेजाची आम्ही उपासना करतो.


चिंतन 

देव- देशसेवेसाठी सर्वही करीन, चित्त वित्त जीवन माझे सर्व हारवीन, प्राणपुरुष माझे माझ्या मातृभूमीवर कामी, जरी येई उपयोगाला कितिक होई नामी.


-आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी प्रत्येकाने तन मन धनाने झीज सोसली पाहिजे. देशाची सेवा हीच खरी ईश्वरपूजा आहे. देश हा देव आहे. आपल्या देशासाठी प्रसंगी प्राणार्पण करायची वेळ आली, तर त्याचीही प्रत्येकाने तयारी ठेवली पाहिजे. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. भारतमाता स्वतंत्र झाली. आता या भारताच्या उत्कर्षासाठी आपण सायांनी तन मन धनाने कार्य करायला हवे. 


कथाकथन 

'पावनखिंडीतला परमवीर'

मार्च १६६० मध्ये पन्हाळगडला घातलेला वेढा तीन महिने झाले तरी उठेना वा त्याचा पीळ कमी होईना. गडातला दाणागोटा तर संपायची वेळ आली. 'आता काय करायचं' हा विचार गडातल्या प्रत्येकाला सतावू लागला असता, महाराजांनी आपल्या टेहेळकऱ्यांना एका रात्री गुप्तपणे गडाबाहेर पाठवून, गडाभोवतीच्या वेक्यात कच्चा पहारा कुठे आहे ते जाणून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपले वकील गंगाधरपंत यांना शरणागतीचा पांढरा बावटा घेऊन सिद्दी जौहरकडे पाठविले. गंगाधरपंत व जौहर यांची बोलणी झाली. उद्या रात्री शिवाजी निःशस्त्र | स्थितीत अवघ्या १० माणसांसह आपल्याकडे शरणागत म्हणून येणार हे जाणून जसा जीहर खूश झाला, तसेच त्याचे सर्व सैन्यही खूश होऊन त्या रात्री वेळा सुस्त झाला. या संधीचा फायदा घेऊन शिवप्रभू हे बाजीप्रभू देशपांडे व निवडक ६०० मावळे यांच्यासह अपरात्री गडाबाहेर पडले. जाताना खरे शिवाजी महाराज मावळ्याच्या वेषात होते, तर बरोबर घेतलेल्या पालखीत महाराजांच्याच तोंडवळ्याचा त्यांचा न्हावी शिवा याला 'महाराज' बनवून बसविले होते. अगदी जराही आवाज होऊ न देता सर्वांनी वेढा पार केला; पण त्याबाहेर रानात दडलेल्या जौहरच्या नजरबाजांना महाराज पालखीतून निसटून जात असल्याचा सुगावा लागला. साहजिकच शत्रूच्या गोटात धावपळ होऊन पालखीतल्या नकली महाराजांना अटक झाली आणि खया शिवाजी महाराजांची स्वारी आपल्या साथीदारांसह विशाळगडाच्या मार्गाला लागली. थोड्याच वेळात पकडला गेला तो शिवाजी नव्हे, हे लक्षात येताच जौहरचा जावई मसूद याने संसैन्य महाराजांचा पाठलाग सुरू केला. उजाडता उजाडता विजापूरची खिंड आली. विशाळगड चार कोसांवर राहिला. बाजी शिवप्रभूंना म्हणाले, "महाराज! गनिम सैन्यासह दृष्टीच्या रण्यात आला. आपण तीनशे मावळ्यांसह पुढे व्हावे. मी उरलेल्या तीनशे मावळ्यांसह गनिमाला खिंडीत रोखून, स्वामीकार्याकरिता देह ठेवतो. मात्र गडावर पोहोचताच इशारतीच्या तीन तोफा डागाव्यात.” महाराज त्याप्रमाणे पुढे गेले आणि बाजी एखाद्या अडसराप्रमाणे खिंड अडवून उभे राहीले. मसूदने व त्याच्या सैन्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण त्यांना बाजींनी खिंड पार करू दिली नाही. त्या तीन हजार शत्रुसैन्याला तोंड देता देता अर्धेअधिक मावळेच नव्हे, तर बाजींचा भाऊ फुलाजी हाही कामी आला. स्वतः बाजींच्या शरीरावर बाणांचे व तलवारींचे आघात होऊन जणू त्यांची | चाळण झाली, तरीही ते झुंजत राहिले. अखेर मसूदच्या तलवारीच्या वाराने बाजींची छाती चिरफाळली. आता ते पडणार तोच कानी इशारतीच्या तोफांचे ध्वनी पडले. 'माझे कर्तव्य मी पार पाडले. आता मरायला हरकत नाही.' असे म्हणून बाजींनी समाधानाने देह रणी ठेवला.


सुविचार

 • जशास तसे याचा अर्थ दुश्मनाची तलवार जितकी मजबूत तितकी आपली ढाल मजबूत असली पाहिजे. आचार्य विनाबा भावे 

 • कोणतेही ध्येय घेतले तरी ते साध्य होण्याकरीता उद्योग करावा लागतो. ध्येय आपणाहून निरुद्योगी माणसाच्या हातात पडत नाही. 

दिनविशेष 

बाजीप्रभू देशपांडे यांचे प्राणार्पण १६६०

: बाजीप्रभू देशपांडे हा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपैकी एक अतिशय शूर, निष्ठावंत योद्धा होता. सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्याच्या तावडीतून, नजर चुकवून? मावळ्यांसह शिवाजी महाराज बाहेर पडले; परंतु शत्रूच्या लक्षात येताच त्याने पाठलाग सुरू केला. त्या वेळी बाजीप्रभूने शिवाजी महाराजांना आग्रहाने सांगितले, “आपण विशाळगडी कूच करावे. मी शत्रूला खिंडीत रोखून धरतो. विशाळगडी पोहोचताच तोफांचे बार उडवावेत म्हणजे आपण सुरक्षित पोहोचल्याचे कळेल." शूर वीर बाजीप्रभू खिंडीत उभा राहीला. | पाठोपाठ सिद्दी जोहर येऊन थडकला. बांजीप्रभूने त्याच्यावर निकराने हल्ला केला. अनेक यवनांना त्याने यमसदनास पाठविले. प्राणांच्या पराकाष्ठेने बलाढ्य शत्रूला रोखून धरले. थोडक्याशा मावळ्यांनिशी अतुलनीय पराक्रम गाजविला. अंगाच्या चिंधड्या उडत असतानाही शत्रूला थोपविले. तोफांच्या आवाजाने महाराजांच्या सुरक्षेची ग्वाही दिली आणि बाजीप्रभूने प्राण सोडले. 

मूल्ये 

शोर्य, स्वामिनिष्ठा, देशप्रेम. 

अन्य घटना 

• लोकमान्य टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरू- १९०८ 

• प्रसिद्ध गायिका केसरबाई केरकर यांचा जन्मदिन १८९३ 

•  क्रिकेट सामन्यांचे अतिशय सुंदर धावते वर्णन करणारे प्रसिद्ध क्रीडा समीक्षक बॉबी तल्यारखान यांचे निधन - १९९०

उपक्रम 

• बाजीप्रभूंची स्वामिनिष्ठा दाखविणाऱ्या प्रसंगाचे नाट्यीकरण करून घ्यावे. 

• लोकमान्य टिळकांचे ग्रंथ व त्यांचे केसरी हे वृत्तपत्र यांचा परिचय करून घ्यावा.


समूहगान 

या भूमिचे पुत्र आम्ही, उंचवू देशाची शान... 


सामान्यज्ञान 

• अजंठा हे औरंगाबाद शहराजवळ असलेले गाव तेथील लेण्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. या लेण्यांमध्ये एकंदर चोवीस बौद्ध मठ आणि पाच देवळे आहेत. यांतील काही लेणी तर २००० वर्षांपूर्वीची आहेत. २५९ फूट उंचीच्या एका सरळ दगडावरती कोरलेली आहेत. यांची लांबी १/३ मैल एवढी आहे. घोड्याच्या नालाच्या आकाराच्या बोगद्यांमधील ही भित्तिचित्रे जगामधील उत्कृष्ट चित्रकलेचा नमुना म्हणून ओळखली जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा