Godavari Tambekar

This is educational blog.

Breaking

Res ads

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
Click On Image

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

15 जुलै-दैनंदिन शालेय परिपाठ

प्रार्थना 

-सर्वात्मका शिव सुंदरा, स्वीकार या अभिवादना - 

श्लोक

 - नित्याभिवादन शीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः । चत्वारिस्तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम् ॥

 -  जो विद्यार्थी नेहमी वडिलधाऱ्यांची सेवाशुश्रूषा करतो व त्यांना नम्रभावाने अभिवादन करतो, त्यांचा आदर करतो अशा विद्यार्थ्यांचे आयुष्य, विद्या, यश आणि बल या चार गोष्टी नेहमी वाढत जातात.

 → चिंतन 

 -चांगले आरोग्य हाच खरा दागिना. 

 -आरोग्याला दागिना का बरे म्हटले आहे? दागिना आपण कशासाठी वापरतो? आपले शरीर शोभून दिसावे, चारचौघांत उठून दिसावे म्हणून. पण एखाद्या अगदी किरकोळ, सदा आजारी असल्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने अंगावर उंची वस्त्रे परिधान केली, खूप दागिने घातले तर त्याला लोक नावे ठेवतात. 'काय पाप्याचे पितर आहे बघा ! अंगावर काहीतरी रया आहे का?" उलट एखादी आपले आरोग्य व्यवस्थित सांभाळणारी, अगदी साधे स्वच्छ कपडे घातलेली व्यक्तीही चार माणसांत उठून दिसते. म्हणूनच आरोग्य हाच माणसाचा खरा दागिना आहे असे म्हटले जाते. 


कथाकथन 'बालगंधर्व'

- (जन्म २६ जून १८८८ मृत्यू १५ जुलै १९६७) 'मराठी रंगभूमीला पडलेलं एक सुंदर संगीत स्वप्नं' असे ज्यांचे नाट्यरसिक वर्णन करीत, त्या नारायण श्रीपाद राजहंसांचा जन्म पुण्यात झाला. बालपणापासून त्यांना संगीताचे शिक्षण मिळाले. १९११ मध्ये | त्यांनी 'किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्यांचे गाणे ऐकून लोकमान्य टिळकांनी त्यांना 'बालगंधर्व' ही पदवी बहाल केली. तेच पुढे त्यांचे नाव होऊन बसले. किर्लोस्कर कंपनी करीत असलेल्या 'शारदा' नाटकातील त्यांची शारदेची भूमिका इतकी गाजली, की त्यांचे नाव व त्यांनी त्या नाटकात गायलेली पदे महाराष्ट्रातील घराघरांत गेली. सन १९१३ मध्ये त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळी सोडली आणि गोविंदराव टेंबे व गणपतराव बोडस यांना भागीदार घेऊन गंधर्व नाटक मंडळी काढली. चार-पाच वर्षांनी ते एकटेच त्या नाटकमंडळीचे मालक झाले. आपल्या गाण्याने व अभिनयाने त्यांनी मराठी रंगभूमीला वैभवाच्या शिखरावर नेऊन बसविले. नाटकात स्त्रियांच्या भूमिका ते कमालीच्या सहजतेने व समरसतेने वठवीत. शारदा, कामिनी, सिंधू, द्रौपदी, सुभद्रा अशा प्रमुख संगीत स्त्री भूमिका त्यांनी वेगवेगळ्या शैलीने वठवून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरीतही नाट्य व संगीतरसिकांना मोहून टाकले. त्यांची साडी, नथ, केशरचनेचे नवनवे प्रकार पाहून महाराष्ट्रातील स्त्रिया त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता | मानू लागल्या. मराठी नाट्य व गायन रसिकांना त्यांनी जवळ जवळ पन्नास वर्षे झुलवीत ठेवले. १९२९ मध्ये पुणे येथे भरलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला. पुढे १९३४ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 'धर्मात्मा' या बोलपटात त्यांनी संत एकनाथांची भूमिका केली; पण चित्रपटसृष्टीत ते तेवढेसे गाजले नाहीत. नाटकांवर त्यांनी जेवढा पैसा मिळविला व घालवला त्याबाबतीत कुठलाही नट वा नटी त्यांची बरोबरी करू शकणार नाही. त्यांनी धर्मादाय प्रयोगही अनेक केले व आपल्या अनेक नाटकांचे उत्पन्न निरनिराळ्या सेवाभावी संस्थांना दिले. त्यांनी केलेल्या नाट्यसेवेच्या गौरवार्थ राष्ट्रपतींनी त्यांना 'पद्मभूषण'। हा किताब बहाल केला. ऐन उमेदीत जरी त्यांनी अमाप पैसा मिळविला, तरी त्यांच्या जीवनाचा शेवट मात्र निष्कांचन स्थितीत झाला. 

सुविचार

 •'कवी, नाटककार राष्ट्राचे प्राण नसले तरी अलंकार मात्र आहेत.' 

 •या जगात केवळ दया, प्रेम असून भागत नाही. जीवन सुंदर - व यशस्वी करण्यासाठी प्रेम, ज्ञान, वळ, कलाकार व रसिकतेची आवश्यकता आहे.

 → दिनविशेष 

बालगंधर्वांचा स्मृतिदिन १९६७

 नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांचे नाव माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे अवघडच. बालवयात लोकमान्य टिळकांकडून त्यांनी बालगंधर्व सन्मान मिळविला. बालगंधर्व हे एक असामान्य नट होऊन गेले. नाटकातील स्त्रीभूमिका ते इतक्या सुंदर करीत, की त्यांच्या चालण्या-बोलण्याचे अनुकरण इतर स्त्रिया करीत. त्यांनी किर्लोस्कर, खाडीलकर या नाटककारांच्या नाटकातून भूमिका करून नाटककारांना आणि त्यांच्या नाट्यकृतींना अजरामर केले. स्वयंवर, मूकनायक, मृच्छकटिक, शाकुंतल इत्यादि नाटकांतील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. लोभस रूप, जातिवंत अभिनय आणि सदाबहार गायकी यामुळे बालगंधर्वांच्या भूमिकांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. बालगंधर्वांनी संगीत | नाटकांचे 'सुवर्णयुग' निर्माण केले. १९४४ साली मुंबईत झालेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे ते अध्यक्ष होते. १९६४ मध्ये पद्मभूषण हा सन्मान देऊनभारत सरकारने त्यांचा गौरव केला. 

मूल्ये 

- • कलाप्रेम, नाट्याभिरुची, आरोग्य.

 → अन्य घटना 

 • जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका मोंगुबाई कुर्डीकर यांचा जन्म १९०४.

 •  'कुटुंबनियोजन' या विषयावर लेख लिहून त्याचा जोरदार प्रसार करणारे रघुनाथ धोंडो कर्वे यांचा 'समाजस्वास्थ्य'चा पहिला अंक प्रकाशित झाला - १९२७. 

• शिक्षणतज्ज्ञ व उत्तम वक्ते शिवाजीराव भोसले यांचा जन्म १९२७. •

• पंडित जवाहरलाल नेहरू यांना 'भारतरत्न' पदवी प्रदान १९५५. •

•  'ज्ञानप्रबोधिनी, शैक्षणिक क्षेत्रातील संस्थेचा पुणे येथे प्रारंभ झाला - १९६२.

 • केसरी व तरुण भारत यांचे माजी संपादक ग. वि. केतकर यांचे निधन - १९८०. 

• श्री. पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मेगॅसेसे हा पुरस्कार जाहीर - १९९६ 

उपक्रम

 • बालगंधर्वांच्या चरित्रातील काही प्रसंग सांगावे. 

-> समूहगान 

-- • झेंडा अमुचा प्रिय देशाचा, फडकत वरी महान 

सामान्यज्ञान

 संस्कृतमधील काही प्रसिद्ध नाटके व त्यांचे लेखक -

 • शाकुंतल - कालिदास

 •  मुद्राराक्षस- विशाखादत्त 

 • स्वप्नवासवदत्तम् भास

 •  वेणीसंहार भट्टनारायण

 • मृच्छकटिक शूद्रक

 • विक्रमोर्वशीय कालिदास

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा