→ प्रार्थना
आई माझा गुरू, आई कल्पतरू, सुखाचा सागरू आई माझी.
→ श्लोक
- णमो अरिहंताणां । णमो सिद्धाणां ॥ वार : णमो अइरियाणं । णमो उवज्झाणाणं णमो लोग सब्यसाहूणं ॥ - जैन तत्त्वातून.
अरिहंताना नमस्कार असो. सिद्धांना नमस्कार असो. आचार्यांना नमस्कार असो. उपाध्यायांना नमस्कार असो. जगातील सर्व साधूंना नमस्कार असो.
→ चिंतन
- लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय. - आईनस्टाईन
लहान मुलांना आपल्याभोवती असणाऱ्या साध्या गोष्टींविषयी कुतूहल असते. जिज्ञासा असते. दिसणाऱ्या गोष्टींचा कार्यकारणभाव जाणून घ्यायची इच्छा असते. म्हणूनच ती घरीदारी, शाळेत, आई वडिलांना आणि शिक्षकांना नाना प्रकारचे प्रश्न विचारीत असतात. अशा वेळी त्यांना गप्प बसायला न सांगता त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत. आपल्याला काही उत्तरे येत नसतील, तर ती उत्तरे ज्यात असतील अशी पुस्तके त्यांना वाचायला सांगावीत.
→ कथाकथन 'श्यामची आई' :
लहानग्या श्यामवर त्याच्या आईने फार सुरेख असे संस्कार केले होते. श्यामची आई अगदी सहजपणे बोलायची आणि त्या मायाभरल्या बोलण्यातून ती चिमुकल्या श्यामला असे काही सुंदर तत्त्वज्ञान सांगून जायची, की श्यामवर त्याचा दीर्घकालीन परिणाम व्हायचा. एक | दिवस काय झाले की श्याम घराजवळच्या बागेत खेळायला गेला होता. गुलबक्षीचे झाड कळ्यांनी फुलून आले होते. अजून फुले उमलून आली नव्हती. श्यामने काय केले तर गुलबक्षीच्या मूठभर कळ्या तोडल्या आणि तो घरी आला. श्यामच्या आईने त्या तोडलेल्या कळ्या पाहून श्यामला म्हटले की, 'अरे श्याम, तुला सांगते की झाडांवर आणि वेलींवर लगडलेल्या कळ्या कधी तोडू नयेत. कळ्या या बिचाच्या मुक्या असतात. त्यांना काही आपल्यासारखे बोलता येत नाही. दुसरे एक सांगते तुला श्याम, झाड काय किंवा वेल काय..... ती फुलांची आईच असते. त्या कळ्या आपल्या आईच्या मांडीवरच छानपणे फुलून येतात, कळ्यांना तोडणे म्हणजे त्या मुक्या लेकरांना आईच्या मांडीवरून खेचून घेणे आहे...' श्यामची आई श्यामला इतक्या समजुतीच्या सुरात सांगत होती, की श्यामच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. श्याम चटकन् आईच्या कुशीत शिरला आणि म्हणाला, 'आई, मी झाडावरच्या कळ्या ह्यापुढे कधीच तोडणार नाही. मला तू क्षमा कर.' श्यामचे हृदय अतीव दुःखाने भरून आले. आईने त्याला प्रेमाने कुरवाळले. म्हणाली, 'श्याम, माणसाच्या हातून नेहमी अनवधानानेच चुका होतात. आपण काय लक्षात ठेवायचे, तर त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायची...' श्यामने मान डोलावली. मग आई। त्याला म्हणाली की, 'श्याम, बंब तापलेला आहे. खेळल्यामुळे तुझ्या अंगाला खूप माती लागली आहे. चल, मी आंघोळ घालते. मग तू देवाला नमस्कार करून अभ्यासाला बस.' श्यामच्या आईने श्यामला गरम-गरम पाण्याने आंघोळ घातली. कोरड्या पंचाने अंग पुसले. तेवढ्यात श्याम आईला म्हणाला की, 'आई माझ्या तळव्याला अजून ओलं आहे. पंचासुद्धा आता ओला झाला आहे. तुझा पदर पसर. मी त्यावर पाय ठेवतो. म्हणजे माझ्या पायाला पुन्हा माती लागणार नाही.' श्यामच्या आईने पदर पसरला. श्यामने आपले ओले पाय त्यावर ठेवले आणि ते कोरडे केले. आई चटकन श्यामला म्हणाली, 'श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून एवढे जपतोस. त्यापेक्षा मनाला घाण लागणार नाही याची काळची घे. प्रथम मनाला जप हो...' अशा पद्धतीचे जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान श्यामची आई सांगायची.
→ सुविचार -
● '(आई = आ म्हणजे आत्मा + ई म्हणजे ईश्वर होय.) प्रीतीचे माहेर, मांगल्याचे सार, अमृताची धार आई माझी.'
-एका आदर्श मातेची बरोबरी शंभर शिक्षकही करू शकत नाहीत.
-गुरुपेक्षा श्रेष्ठ, आकाशापेक्षा उंच, सागरापेक्षा अथांग आईचे। वात्सल्य असते.
• आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर असतात.
• आचारात हवी शुचिता, वाणीत हवी मृदु मधुरता, वृत्तीत हवी सात्त्विकता, मनात हवी कृतज्ञता, उच्चारात हवी विनम्रता, कृतीत हवी क्षमाशीलता. '
→ दिनविशेष • पुरुषोत्तमदास टंडन यांचा स्मृतिदिन - १९६२ :
राजर्षी पुरुषोत्तम टंडन यांचा जन्म अलाहाबाद येथे १८८२ मध्ये झाला. शिक्षण | पूर्ण झाल्यावर त्यांनी काही दिवस वकिली केली; परंतु १९२० पासून वकिली सोडून कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेऊन, राजकारणात प्रवेश केला. ते हिंदी भाषेचे कट्टर पुरस्कर्ते होते. १९५१ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. साधी राहणी, उच्च विचारसरणी, निःस्पृह आचार व निर्भय विचार | यांमुळे ते मोठ्या गौरवास पात्र ठरले. स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांना अनेक वेळा तुरूंगवास भोगावा लागला. १९५० साली नाशिक येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. नेहरूंचे पाकिस्तानविषयक धोरण त्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपदही सोडून दिले. अहिंसा व्रताचे ते काटेकोरपणे पालन करीत. ठार मारलेल्या जनावरांच्या कातड्यांची पादत्राणे ते वापरीत नसत. ते राष्ट्रभाषा हिंदीचे निष्ठावंत प्रचारक होते. म. गांधी त्यांचा राजर्षी असा उल्लेख करीत. अशा या थोर नेत्याचा १९६१ साली भारत सरकारने 'भारतरत्न' हा सन्मान देऊन बहुमान केला. २ जुलै १९६२ रोजी राजर्षी टंडन यांचे निधन झाले.
→ मूल्ये - • देशप्रेम, ज्ञाननिष्ठा.
→ अन्य घटना
• थोर शास्त्रज्ञ चार्लस् डार्विन यांनी उत्क्रांतिवादाचा सिद्धांत जाहीरपणे सर्वांपुढे मांडला - १८५८.
- • भारत पाकिस्तान दरम्यान सिमला करार १९५२ • तामिळनाडूमधील कल्पक्कम येथे अणुऊर्जा केंद्राची स्थापना १९८३
→ उपक्रम
• भारतरत्न' पदवी मिळालेल्या ५ व्यक्तींची नावे मुलांना लिहायला सांगावीत.
> समूहगान -• सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा
→ सामान्यज्ञान • आपला तिरंगी ध्वज हे ऐक्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग प्रकाशाचा, सत्याचा, साधेपणाचा निदर्शक आहे. केशरी रंग त्यागाचा अन् नम्रतेचा निदर्शक आहे. हिरवा रंग जीवनातील चैतन्य, समृद्धी आणि शांती दाखवितो. ध्वजाच्या मध्यभागी असलेले चक्र सांगते। गतिमान व्हा, गतिशील राहा. त्याचा निळा रंग काल दर्शवितो. काल अनंत आहे, असे सांगतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा