→ प्रार्थना
:लावियेला दीप प्रेमे, तेवता ठेवू चला ...
→ श्लोक
जनी सर्वसूखी असा कोण आहे? विचारे मना तूचि शोधूनि पाहे । मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले । तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥
-सर्व लोकांमध्ये पूर्णपणे सुखी असा कोण आहे काय, याचा नीट विचार करूनच तू शोध घे. (सर्वसुखी असा एकही मनुष्य नाही.) हे मना, तू या आधी किंवा पूर्वजन्मी जशी कर्मे केली आहेस, तशीच फळे (सुख दुःखे) सध्या तुला भोगावी लागत आहेत. हे शांतपणे सोशीत राहा.
→ चिंतन
ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय ज्ञान कोरडे आहे आणि कर्म अवतीर्ण झाल्याशिवाय ज्ञान भक्तीस अर्थ नाही. - साने गुरुजी
- मोक्ष हे भारतीय संस्कृतीने जीवनाचे अंतिम ध्येय सांगितले आहे. ते ध्येय गाठण्यासाठी कर्म, भक्ती, ज्ञान अशा विविध मार्गांचा अवलंब केला जातो; परंतु मानवी जीवन सर्वांगांनी विकसित व्हायचे असेल, तर या तिन्ही मार्गांचा अवलंब एकत्रितपणे केला पाहिजे. तुम्ही ज्ञानसंपन्न असाल पण मनात भक्ती नसेल, तर ज्ञान शुष्क होईल. अंधश्रद्धेने भक्ती करत असाल तर तेही योग्य नाही किंवा ज्ञान असेल, भक्ती असेल पण त्यानुसार प्रत्यक्ष कृती नसेल, तर त्याचाही उपयोग नाही. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्या त्रिवेणी संगमानेच मोक्षसिद्धी घडते.
→ कथाकथन
'संत तुलसीदास' :
('रामचरित मानस'चा रचयिता) डॉ. कामिल बुल्के हा विदेशी माणूस सारे जीवन 'रामचरित मानस'चे अध्ययन करण्यासाठी भारतात राहिला होता. तत्कालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अध्ययन करीत राहिला. भारतीय संस्कृतीत रामनामाचा महिमा अपार आहे. 'राम राम' म्हणत दोन्ही हात जोडून अभिवादन करण्याची नम्रता प्रत्येक भारतीयात आढळते. गोस्वामी संत तुलसीदासाचे जन्मगाव उत्तर प्रदेशातील राजापुरा असावे असा अंदाज आहे. 'रत्नावली' या सौंदर्यशालिनीशी त्यांचा विवाह झाला. तिच्यावरील प्रेमाने तो पागल झाला. तिचा विरह त्याला सहन झाला नाही. तो गंगानदी पोहून, मृत सर्पाची दोरी करून तिच्या माहेरी तिला भेटला. “एवढं प्रेम ईश्वरावर केलेत तर... ?" तिने त्याला विचारले, तेव्हा त्याला उपरती झाली. तो रामभक्तीत लीन झाला. अशी आख्यायिका आहे. भक्तिमार्गाचे उपासक असलेल्या तुलसीदासांना लहानपणी काशीच्या नरहरिदास स्वामींनी सांभाळले होते. वेद, उपनिषदे, पुराणे, अठरा शास्त्रे इ. प्राचीन ग्रंथांचे ज्ञान त्यांना शिकविले होते. रत्नावलीच्या ईश्वर- राम- शब्दाने केवढे परिवर्तन घडवून आणले याची तिलाही कल्पना आली नाही. हिंदू समाजात त्यांच्या काव्यग्रंथाने प्रचंड परिवर्तन घडवून आणले. 'रामचरितमानस' हा श्रीरामाच्या आदर्शाचे सुक्ष्म दर्शन घडवितो. तत्कालीन बहुजन समाजाच्या लोकभाषेत हे काव्य लिहिले आहे. इस्लामी लोक 'कुराण' वाचतात, ख्रिश्चन लोक 'बायबल' वाचतात, त्याच भक्तिभावनेने हिंदू लोक 'रामचरितमानस' वाचतात. अकबराचा उदारमतवादी दृष्टीकोन स्वीकारणारा राजा मानसिंग हा तुलसीदासाचा निरसीम भक्त होता. हनुमानभक्त होता. तुलसीदासांच्या रामचरितमानसात तात्विक चिंतनासमवेतच हिंदी भाषेचा डौल आहे. शब्दालंकार, अर्थकार, नवरसयुक्त मधुर शब्दांचे भांडार आहे. हिंदू धर्मातील पावित्र्य व धार्मिक निष्ठा मुस्लिम आक्रमणामुळे ढेपाळल्या होत्या. स्वच्छंदीपणा, खराचार बोकाळला होता. अज्ञानाचा सागर पसरला होता; परंतु तुलसीदासाने हे सामाजिक परिवर्तन घडवून आणले. जनसामान्यांच्या भाषेत सांस्कृतिक मानस परिवर्तन केले. माणसाने 'मर्यादापुरुषोत्तम राम' आदर्श मानला. रामभक्तीत सदाचरणाचे, श्रद्धेचे धडे आहेत. हिंदी साहित्यपरातील तुलसीचे 'रामचरितमानस' हा कौस्तुभमणी आहे. जगभर भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक ज्ञानासाठी या ग्रंथाचा अभ्यास केला जात आहे.
→ सुविचार
- • ईश्वर हाच सर्व प्राणिमात्रांची प्रेरणा आहे आणि त्याची कृपा हवी असेल तर एकच रहस्य आहे आणि ते म्हणजे स्वकर्मपुण्याने त्याची पूजा करणे.
• जीवनात ज्ञान, कर्म व भक्ती यांवर श्रद्धा ठेवावी, तरच तो यशस्वी होतो.
→ दिनविशेष -
• संत गुलाबराव महाराज जयंती - १८८१ :
• विदर्भातील एक सत्पुरुष, चार महिन्याचे असताना त्यांना अंधत्व आले. भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिस्ती व मुसलमानादी सर्व समावेशक धर्माचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद संगीत इ. अनेक विषयांवर लेखन केले. संस्कृत, हिंदी, मराठी या भाषांतून व वऱ्हाडी बोलीतून त्यांनी सुमारे १२५ ग्रंथ लिहिले. ओव्या २७,०००, अभंग २५,०००, पदे २५००, म्लोकादी रचना ३००० इत्यादींचा त्यात समावेश आहे. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्मयप्रकार त्यांनी हाताळले. अवघ्या ३४ व्या वर्षी ६ सप्टेंबर १९१५ ला त्यांचे महानिर्वाण झाले.
→ मूल्ये
• मानवता, विज्ञाननिष्ठा
→ अन्य घटना
• गोस्वामी तुलसीदासांचा जन्म १५३१
• सयाजीराव गायकवाड यांच्या प्रयत्नाने बँक ऑफ बडोदाची सुरुवात झाली - १९०८
• 'सर्प' या विषयावर संशोधन व लेखन करणारे सर्पमित्र डॉ. पु. अ. देवरस यांचा जन्म १९०९
•रेडिओचा शोध लावणाऱ्या मार्कोनी या शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन १९३०
•अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरला - १९६९.
→ उपक्रम
• गुलाबराव महाराजांचे अभंग पाठ करावेत. •
• महाकवी तुलसीदासांची जयंती साजरी करा व त्यांच्या साहित्याची माहिती मुलांना सांगा.
→ समूहगान
• मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला ....
→ सामान्यज्ञान
• फिनलंड या देशात १०० टक्के साक्षरता आहे. १९२१ पासून प्रत्येक मुलाला वयाच्या सातव्या वर्षापासून शिक्षण सक्तीचे आहे. प्राथमिक शिक्षण विनामूल्य असून, सर्व विद्यार्थ्यांना शाळेत जेवण, वह्या-पुस्तके, औषधे व गरजू मुलांना कपडे पुरविले जातात..
• प्रमुख शास्त्रीय उपकरणेः
•अॅक्टोमीटर समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरण्याचे साधन
•क्रोनोमीटर जहाजावर कालमापन - - करणारे उपकरण.
• टेलिग्राफ सूर्यकिरणांच्या आरशातील प्रतिबिंबाच्या साहाय्याने संदेशवहनासाठी वापरले जाणारे उपकरण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा