→ प्रार्थना
सुखी ठेवी सर्वास देवराया....
→ श्लोक
- आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपुः । नास्ति उद्यम समो बन्धुः कृत्वा यं नावसीदति ॥
: आळस हा माणसाच्या शरीरातील मोठा शत्रू असून, उद्योगासारखा कोणी जीवलग नाही. उद्योग केल्याने मनुष्य नाश पावत नाही.
→ चिंतन
वैराने बैर ना होई कधी शांत । अवैरेची शांत होत असे ।।
-एकमेकांत वैर, शत्रुत्व असले तर ते न वाढविता कमी कसे होईल, याचा विचार केला पाहिजे. वैन्याशी वा शत्रूशी वैरभावाने वा शत्रुत्वाने वागत राहिले तर ते वाढतच जाईल. शांत होणारच नाही. उलट त्यातून हिंसात्मक घटना निर्माण होतात. कधी-कधी हे वैर केवळ व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही, तर ते पिढ्यान पिढ्या चालू असते. हे योग्य नाही. म्हणूनच मरणान्तानि ( मरणापर्यंतच वैर असते) असे म्हणतात. मग हे वैर शांत कसे होणार? वैन्याशी शत्रूशी प्रेमाने, आपुलकीने, वैर सोडून वागल्यानेच ते शांत होईल.
→ कथाकथन
मेहनतीचे महत्व
-गोष्ट खूप जुनी आहे. हमीमपूर गावात रघुवीर नामक एक गरीब शेतकरी राहत होता. तो शरीराने एकदम धष्टपुष्ट होता; पण शेतात मेहनत करायचा अतिशय कंटाळा करत असे. कामापासून तो स्वतःला दूरच ठेवत असे. तो भगवान कृष्णाचा परम भक्त होता. कृष्णाची पूजाअर्चा मोठ्या भक्तिभावाने आणि आदराने करत असे. एकदा रघुवीर शेतात बसल्या बसल्या विचार करत होता. 'जर मला कृष्ण भगवान प्रसन्न झाले, तर मी त्यांच्याकडे श्रीमंत होण्याचे वरदान मागीन' आणि खरोखरच भगवान कृष्ण साक्षात तिथे हजर झाले व म्हणाले, 'माग रघुवीर, एखादे वरदान माग' साक्षात देवाला समोर पाहून तो अवाक् झाला. तेव्हा त्याने कृतज्ञता प्रकट करून म्हटले, 'माझे अहोभाग्य की मला तुमचे दर्शन झाले ! प्रभू, माझ्या पेट्या हिरे-मोती, सोन्या-चांदीने भरून जातील असे वरदान था. भगवान कृष्ण म्हणाले, 'रघुवीर, तू लालची कधीपासून झालास? काही दुसरे माग. ' | रघुवीर म्हणाला, 'नाही प्रभु! मला दुसरे काहीच नको' तेव्हा देवाने त्याचा लोभ दूर करण्यासाठी एक अट घातली व म्हणाले, 'बघ तू जे काही मागशील ते तुझ्या शेजार-पाजाऱ्यांना न मागताच मिळेल.' रघुवीरला सगळ्यांचे भले व्हावे असे वाटत होते. त्यामुळे त्याने अट मान्य केली. भगवान कृष्ण तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. रघुवीर सरळ घरी गेला आणि त्याने पेट्या उघडून पाहिल्या' सगळ्या पेट्यांमध्ये हिरे-मोती, सोने-चांदी भरलेली होती. त्याने खिसे भरून रुपये घेतले आणि तो बाजारात गेला. रस्त्यात लोकांना आनंदी झाल्याचे पाहून तोही आनंदित झाला. तो एका कापडाच्या दुकानात गेला व त्याने एक कापड मागवले व त्याची किंमत विचारली. तेव्हा दुकानदार त्याला म्हणाला, 'रुपयांची आता काहीही किंमत उरली नाही.' 'असे कसे शक्य आहे?' रघुवीरने अत्यंत आश्चर्याने विचारले. दुकानदाराने त्याला समजावत म्हटले, 'अरे! प्रत्येकाजवळ भरपूर रुपये, पैसे आलेले आहेत. आता कुणालाच त्यांची गरज राहिलेली नाही. दुकानदारने त्याला खूप समजावले; पण रघुवीरच्या ही गोष्ट मुळीच लक्षात येईना. तो पुढच्या दुकानात गेला. तिथेही तोच प्रकार. एका मागून एक दुकानांमध्ये तो गेला. पण सर्वांच उत्तर तेच होते की, 'पैसे नकोत, गहू, तांदुळ, डाळ, चणे काहीही आण. रुपये आमच्या कडे भरपूर | आहेत. ते आम्हाला अजिबात नकोत. पैशाचा मोबदला देऊन कोणीही आपल्याकडील वस्तू घ्यायला तयार नव्हते. आता प्रत्येकालाच गहू हवे होते. तांदूळ हवे होते. बिचारा रघुवीर अस्वस्थ झाला. काहीही खरेदी करायला गेला तरी त्याच्या समोर हीच परिस्थिती उभी राही. सगळेच पैसे घ्यायला नकार देत असत. आता रघुवीरकडे पैसे असूनही तो कंगालच होता. त्याने पुन्हा श्रीकृष्णाचे ध्यान केले. 'हे प्रभू! तुम्ही मला फसविले आहे हे असले वरदान देऊन. मी काय करू?' हे ऐकताच श्रीकृष्ण त्याच्यासमोर उभे ठाकले व म्हणाले, 'मी तर तुला धोका दिलेला नाही. तू स्वतःला धोक्यात टाकले आहेस.' रघुवीरच्या | जीवात जीव आला. तो म्हणाला, 'हे देवा, ही तुमची माया तुम्ही परत घ्या. मला नको हे वरदान. मी आता खूप मेहनत करीन, कष्ट करीन आणि त्यावरच माझे पोट भरीन व कधीही पुन्हा लालच करणार नाही... कष्टांचा आवाज शब्दांच्या आवाजापेक्षा मोठा असतो.
→ सुविचार
• आराम हराम है - पं. जवाहरलाल नेहरू
• कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजापेक्षा मोठा असतो.
• आजच्या समाजात क्रांती घडवून आणण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत. - संप्रदाय निराकरण, जाती निराकरण, भाषावाद निराकरण, वर्ग निराकरण - आचार्य धर्माधिकारी
• परिश्रमी माणूस आपल्या जीवनाचे सोने करतो. •तुमच्याजवळ धैर्य, चिकाटी व परिश्रम करण्याची जिद्द असेल, तर तुमच्या सर्व इच्छा सफल होतील.
→ दिनविशेष
-छत्रपती संभाजीराजांनी पोर्तुगीजांची जहाजे पकडली - १६८२ : -
-शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजे गादीवर आले. त्या वेळी त्यांना मुख्यतः जंजिऱ्याचे सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज आणि मोगल बादशहा औरंगजेब यांच्याशी युद्धे करावी लागली. धार्मिक जुलूम करून मराठ्यांचा व्यापार नष्ट करण्याचे उद्योग पोर्तुगीज करीत. शिवाय मोगलांशी लढाई करण्यासाठी पश्चिम किनारा आपल्या ताब्यात ठेवणे इष्ट असे संभाजीराजांना वाटले. म्हणून त्यांनी कोणतीही लढाऊ वा व्यापारी जहांजे आपल्या परवानगीशिवाय पश्चिम समुद्रात वावरू नयेत, असा हुकूम काढला, परंतु पोर्तुगीजांनी ते ऐकले नाही. म्हणून संभाजीराजांनी पोर्तुगीजांची जहाजे पकडली. तो दिवस होता २८ जुलै १६८२.
→ मूल्ये
स्वातंत्र्य, स्वाभिमान, शौर्य.
→ अन्य घटना
• 'पेरू' हा देश स्वतंत्र झाला १८२१.
• पहिल्या महायुद्धास सुरुवात -१९१४.
→ उपक्रम
पहिल्या महायुद्धाची कारणे सांगावीत. • संभाजी महाराजांचा धर्मछळ सांगणारी कथा सांगावी.
समूहगान-
• आम्ही बालक या देशाचे, शिकू घडे सारे विज्ञानाचे.....
→ सामान्यज्ञान
• पत्राद्वारा शिक्षण
• संपूर्णतः किंवा अंशतः पत्रव्यवहाराने शिक्षण देण्याची पद्धती. व्यक्तीला आपल्या व्यावसायिक, सांस्कृतिक वा शैक्षणिक गरजांनुसार शिकता यावे, म्हणून या पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. या शिक्षणपद्धतीचा उपयोग प्रौढ व्यक्ती, महिला, कामगार, भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या लोकांसाठी विशेष प्रकारे होते. लेखी व छापील साहित्य, चित्रे व रेखाकृती इत्यादींचा उपयोग पत्राद्वारे शिक्षण पध्दतीत करण्यात येतो. विद्यार्थी शाळेत न जाता आपल्या घरीच व आपल्या इच्छेनुसार शिक्षण घेत असतो. १८४० मध्ये लघुलिपीचा जनक पिटमन इझाक याने आपल्या विद्यार्थ्यांना बायबलमधील उतारे पोस्टकार्डावर लिहून आपल्याकडे पाठविण्यास सांगितले. पत्राद्वारा शिक्षणाचा आरंभ येथूनच झाला, असे समजण्यात येते. भारतात पत्राद्वारा शिक्षणाची सुरुवात १९६१ मध्ये झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा