→ प्रार्थना
-सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा....
→ श्लोक
- मना वासना दुष्ट कामा नये रे । मना सर्वाचा पापबुद्धी नको रे ।
मना धर्मता, नीति सोडू नको हो । मना अंतरी सार विचार राहे
हे मना तू कोणतीही वाईट इच्छा बाळगू नकोस. पापबुध्दीच्या आहारी जाऊ नकोस. नीतिधर्माने जे सांगितले आहे, त्याचा त्याग करु नकोस. सारासार (चांगले कोणते, वाईट कोणते) तो विचार करीत चल.
→चिंतन
-नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो पुण्यभूमी जियेच्याच कामी, पडो देह माझा सदा ती नमी भी । - स्वातंत्र्यवीर सावरकर
-'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयासी।' माता आणि मातृभूमी ही स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे असे या सुभाषितात म्हटले आहे. अशा या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलीदान केले. तिचे वैभव वाढावे, तिचा नावलौकिक वाढावा म्हणून अनेकांनी आपली
जीवनपुष्ये तिच्या चरणी अर्पण केली. आपल्या मातृभूमीसाठी आपण तन मन धनाने कार्य करीत राहणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
→ कथाकथन 'स्वातंत्र्यवीर सावरकर' :
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आईचे नाव होते राधाबाई. कुशाग्र बुद्धीच्या आपल्या विनायकावर त्यांचे अतिशय प्रेम होते. सावरकर स्वतः मातृभक्त होते. आपला देश पारतंत्र्यात आहे, याची तीव्र जाणीव राधाबाई छोट्या विनायकाला नेहमी करून देत. रोज संध्याकाळी आपल्या या भावनाप्रधान मुलाला आपल्या देवघरातील तेजस्वी महिषासुरमर्दिनी दुर्गेच्या मूर्तीसमोर उभे करुन एक मंत्र म्हणवून घेत की, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ ह्या मंत्राचा प्रभाव स्वातंत्र्यवीरांवर शेवटपर्यंत होता. १८५७ चे बंड राधाबाईना पूर्ण ठाऊक होते. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून झाशीच्या राणीपासून अनेकांनी ह्या स्वातंत्र्यवेदीवर आपली आहुती दिली होती. ह्याची जाणीव राधाबाईंना होती. म्हणून सावरकरांच्या आईने छोट्या विनायकाला जसे शिवाजी महाराजांचे चरित्र सांगितले, राम कृष्णाच्या कथा रंगवून सांगितल्या तशा ह्या स्वातंत्र्ययुद्धाच्या गोष्टी सांगून 'विनायका तू धर्मनिष्ठ होऊन, ह्या देशाला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त कर, असे वारंवार आव्हान केले. छोटया विनायकाच्या अंगातले रक्त स्वातंत्र्यऊर्मीनी सळसळत ठेवले. मातृभक्त सावरकरांना आपल्या ह्या प्रेमळ देशाभिमानी आईचा फार काळ सहवास लाभला नाही. त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी सावरकरांची आई एका आजारात देवाघरी निघून गेली. जाताना ती आपल्या या लाडक्या लेकाला म्हणाली, "तात्या, ही महिषासुरर्दिनी देवी ही तुझी आई. तिची आराधना कर. माझी एक इच्छा पूर्ण कर. ह्या देशाला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त कर..... हे हिंदुराष्ट्र व्हावे ही माझी तळमळ आहे. माझी खात्री आहे की, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी तू शेवटपर्यंत लढत राहशील. तुला सांगू, ही मातृभूमी तुझ आई आहे. त्या आईची तू आता सेवा कर..... तात्या ह्या देशाला तू स्वतंत्र कर." छोट्या विनायकाने आपल्या या आईचे शब्द हृदयात घट्ट धरून ठेवलेआणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात यातना सहन करीत, इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. मुलांनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा देशभक्त ह्या विश्वात पुन्हा कधी होणार नाही हे तुम्ही कायमसाठी लक्षात ठेवा. आपल्या आईची इच्छा पूर्ण करणारा हा देशभक्त अष्टौप्रहर फक्त मातृभूमीचेच स्मरण करायचा. आपणसुद्धा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांसारखे देशभक्त होऊ आणि मातृभूमीची सेवा करू, ही शपथ आपण घ्यायला नको का?
→ सुविचार
• 'जेव्हा आपली मने स्वतंत्र होतील तेव्हाच आपण कोणत्याही बंधनातून मुक्त होऊ साने गुरुजी
• मरावे परी कीर्तिरूपे उरावे'.
• असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात. तो गुणी असल्याने त्याला चिंता शिवत नाही, तो शहाणा असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो व तो शूर असल्याने त्याला कधीही भीती ग्रासत नाही'.
•जगून मरण्यापेक्षा, मरून जगण्यात मोठेपणा आहे'.
→ दिनविशेष
सावरकरांची समुद्रातील उडी १९१०:
सावरकर लंडनमध्ये शिकत असतानाची गोष्ट. हिंदुस्थानात क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना सलो की पळो करून सोडले होते. आणि यामागे सावरकरांचा हात आहे अशी ब्रिटिश सरकारची समजूत होती. म्हणून सावरकरांना अटक करण्यात येऊन मोरिया बोटीने भारतात पाठविण्याचे ठरले. फ्रान्समधील मार्सेलिस बंदराजवळ मोरिया बोटीने नांगर टाकला होता. शौचालयाच्या खिडकीतून त्यांनी सरळसमुद्रात उडी घेतली व सपासप पोहत फ्रान्सचा किनारा गाठला. बोटीतून गोळीबार होत होता. तसेच होडक्यामधून पाठलाग; पण कशालाही दाद न देता त्यांनी फ्रान्सच्या भूमीवर पाय टाकला. पण दुर्देव आड आले. फ्रान्सच्या सैनिकांनी त्यांना आपल्या ताब्यात घेऊन इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यांचा हा धाडसी प्रयत्न जरी फसला, तरी त्यांच्या पराक्रमामुळे साऱ्या जगाचे त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले.
-> मूल्ये -
• राष्ट्रप्रेम, धाडस, ध्येयनिष्ठा.
→ अन्य घटना
• लंबकाच्या घड्याळाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ ख्रितिन हायगन्स यांचे निधन- १६९५
• हायड्रोजन वायूने भरलेल्या अजस्त्र आकाराच्या झेपालिन विमानांचे संशोधक फर्डिनांड फॉन झेपलिन यांचा जन्म १८३८
• महात्मा गांधीनी उभारलेल्या टिळक स्वराज्य फंडाच्या मदतीसाठी 'संयुक्त मानापमानाचा अपूर्व प्रयोग १९२१
• बर्लिन (प. जर्मनी) येथे 'दो आँखे बाराह हाथ' या - चित्रपटास सर्वोकृष्ट चित्रपटाचे सुवर्णपदक मिळाले - १९५८
→ उपक्रम
'जयोस्तुते श्रीमहन्मंगले' हे सावरकरांचे स्वातंत्र्यगीत पाठ करून घ्या. • -स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्रातील प्रसंगांची माहिती मिळवा.
-> समूहगान
-हम युवकों का ऽऽऽनारा हैं, हैंड हैंड...
→ सामान्यज्ञान -
• काही महत्त्वाची गीते व त्यांचे लेखक
• झंडा ऊँचा रहे हमारा - शामलान पार्षद
• सबके लिये खुला है - तुकडोजी महाराज
• जन-गण-मन रवींद्रनाथ टागोर
• खरा तो एकची धर्म... - साने गुरुजी
• सारे जहाँ से अच्छा- इकबाल
• वंदे मातरम् - बंकीमचंद्र चटर्जी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा