११ सप्टेंबर -दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम..
→ श्लोक
आरोग्यं, विद्वत्ता, सज्जनमैत्री, महाकुले जन्म । स्वाधीनता च पुंसां महदेश्वर्य विनाप्यर्थे ॥ आरोग्य, विद्वत्ता, सज्जनांशी मैत्री, चांगल्या कुलात जन्म आणि स्वातंत्र्य या गोष्टी म्हणजे माणसाचे मोठे ऐश्वर्य होय. ऐश्वर्याला संपत्ती नसली तरी चालते.
→ चिंतन
प्रतिभा आणि स्वातंत्र्य यांची आवश्यकता अभ्यासात आहे. यांत्रिक न बनता मन जर सृजनशील व्हावयास हवे असेल तर ठराविक रीती आणि तयार निष्कर्ष यांची गुलामगिरी पत्करता कामा नये. प्रत्येक गोष्टीचा स्वतः विचार केला पाहिजे. कुठल्याही प्रश्नांवर स्वतःचा काही निर्णय घेता आला पाहिजे. जे. कृष्णमूर्ती
→ कथाकथन
आचार्य विनोबा भावे' (जन्म- ११ सप्टेंबर १८९५ मृत्यू १५ नोव्हें. १९८२) भूदान चळवळीचे आद्यप्रवर्तक विनायक नरहर भावे तथा || आचार्य विनोबा भावे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई, वडील नोकरीनिमित्त बडोद्यास राहू सगल्याने विनोबांचे प्राथमिक, माध्यमिक व काही उच्च शिक्षण तिथेच झाले. इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस यायला निघाले असता मध्येच सुरत स्टेशनवर उतरून ते संस्कृतच्या अध्ययनाकरिता बनारसला गेले व तिथे त्या भाषेचा अभ्यास करू लागले. तिथल्या वास्तव्यात त्यांनी हिंदु विश्वविद्यालयातील एका समारंभात महात्मा गांधींचे भाषण ऐकले व 'भारताचे पुनरुत्थान गांधीजींच्या मार्गानेच होईल." असे वाटल्याने त्यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहारात गांधीजींनी, विनायक भावेंना 'विनोबा' असे संबोधले. त्यामुळे विनायक भावे हे त्यापुढे विनोबा भावे याच नावाने संबोधले जाऊ लागले. विनोबांनी ७ जून १९१६ रोजी गांधीजींची भेट घेतली व आजन्म ब्रह्मचर्यपालनाची शपथ घेऊन त्यांनी साबरमती आश्रमात आपले साधकाचे जीवन जगायला सुरुवात केली; पण बनारसहून संस्कृत ग्रंथाचे अध्ययन पूर्ण होण्यापूर्वीच ते साबरमती आश्रमात आल्याने गांधींची अनुज्ञा मिळवून ते १९१६ च्या ऑक्टोबरमध्ये वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत गेले व तिथल्या नारायणशास्त्री मराठे ऊर्फ केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली शांकरभाष्य, ब्रह्मसूत्रे, पातंजल योगसूत्रे इ. ग्रंथाचे अध्ययन करून फेब्रुवारी १९१८ मध्ये ते परत साबरमती आश्रमात गेले. त्याच साली सबंध भारतात इन्फल्यूएंझाची भयंकर साथ आली व ती लोकांचा बळी घेऊ लागली. या साथीत आई व धाकटा भाऊ यांना मृत्यू आल्याने विनोबा तिकडे गेले व त्यांचे अंत्यविधी पार पाडून ताबडतोब साबरमतीस परतले. १९२१ साली गांधीजींचे परमभक्त शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रहाश्रमाची एक शाखा वर्ध्याला काढली. या शाखेचे संचालक म्हणून गांधीजींनी विनोबांची नेमणूक केली. १९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल विनोबांना कारावासाची शिक्षा झाली. तेंव्हा धुळे येथील तुरुंगात त्यांनी गीतेवर जी प्रवचने दिली ती साने गुरुजींनी लिहून घेतली व पुढे 'गीताहृदय' या पुस्तकाच्या रूपाने प्रसिध्द झाली. गीतेचे जे त्यांनी समश्लोकीत रूपांतर केले, त्या 'गीताई' पुस्तकाच्या प्रती दहा लाखाच्या घरात संपल्या. १९४० साली वैयक्तिक सत्याग्रहासाठी 'पहिला सत्याग्रही' म्हणून गांधींनी विनोबांची निवड केली. कुराणसार, ख्रिस्त धर्मसार हे त्यांचे ग्रंथही अत्यंत वाचनीय ठरले. भूमिहीन व जमीनदार यांतील वर्गकलह संपुष्टात यावा यासाठी त्यांनी भूमिहीनांना भूमिदान करण्याचे आवाहन जमीनदारांना केले व मिळवलेल्या लाखो एकर भूमीचे वाटप भूमिहीनांमध्ये केले. रेल्वेसंप, मोर्चे, व इतर संप यांच्या अतिरेकाने अराजकता निर्माण होऊ नये म्हणून १९७५ मध्ये इंदिरा गांधीनी पुकारलेल्या आणीबाणीमुळे भारतातील जनता रुष्ट झाली असता, विनोबांनी त्या कृत्याचे 'अनुशासन पर्व' असे समर्थन केले. म्हणून लोक त्यांची 'सरकारी संत' म्हणून अवहेलना करू लागले. शरीर पूर्ण निकामी झाल्यावर त्यांनी सतत ७ दिवस उपोषण करून पवनारमधील परंधाम आश्रमात देहत्याग केला.
→सुविचार
•जो माणसाच्या अंतःकरणाला हात घालतो त्याला कधीच उपदेश येत नाही.
→ दिनविशेष -
• कासिनी जीन डोमिनिको स्मृतिदिन - १७१२ - इटालियन फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ८ जून १६२५ ला झाला. फ्रान्समधील ख्यातकीर्त असा हा शास्त्रज्ञ पॅरिस येथील वेधशाळेचा प्रमुख होता. त्याने खगोलविषयक बरेच संशोधन केले असून शनीचे चार उपग्रह यानेच शोधून काढले. शुक्र, मंगळ, गुरू या ग्रहांच्या गती याने मोजल्या. याचे वैशिष्ट्य हे की याचा मुलगा जॅक्वीस कासिनी, नातू सीझर, फ्रेंकाइस, पणतू जॅक्वीस डोमिनिको हे सर्व खगोलशास्त्रज्ञ होते. तर खापरपणतू अलेक्झांडर हेन्री हा वनस्पतीशास्त्रज्ञ होता. संशोधनाचा वारसा पाचव्या पिढीपर्यंत पोहचवून खगोलशास्त्र व वनस्पतीशास्त्र यात मोलाची भर टाकणारे कासिनी कुटुंब भूषणभूत ठरले यात काय नवल.
→ मूल्ये -
• सहिष्णुता, बंधुभाव
→ अन्य घटना
•आचार्य विनोबा भावे जन्मदिन १८९५ • शिव महिला गौरव दिन, विश्व बंधुत्व दिन
→ उपक्रम
आकाश निरीक्षणाचा छंदवर्ग सुरू करा
→ समूहगान
• मंगल देशा ! पवित्र देशा ! महाराष्ट्र देशा...!
→ सामान्यज्ञान
पृथ्वीवरील एकूण ऑक्सिजन निर्मितीपैकी ५० ते ७० टक्के ऑक्सिजनची निर्मिती समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या अत्यंत सूक्ष्म A आकाराच्या 'फायटोप्लॅक्टन' नावाच्या अब्जावधी वनस्पतींकडून होते. आपली सूर्यमालिका हा आकाशगंगेचा एक भाग आहे. अशा असंख्य आकाशगंगा विश्वात आहेत. सुमारे १६ अब्ज वर्षापूर्वी विश्वाची उत्पत्ती झाली, असे मानले जाते. त्यानंतर तीन अब्ज वर्षांनी आपली आकाशगंगा अस्तित्वात आली. तर सुमारे साडेचार ते पाच अब्ज वर्षापूर्वी सूर्यमालिका अस्तित्वात आली. पृथ्वीवर प्रगत सजीवसृष्टी असून इथल्या समुद्राची उत्पत्तीही सुमारे चार अब्ज वर्षापूर्वीची आहे. आचार्य विनोबा भावे यांची महत्त्वाची पुस्तके मराठी मधुकर, गीताई, गीता प्रवचन, गांधी तत्त्वज्ञान, भूदान यज्ञ - समग्र दर्शन. हिंदी - विनोबाके विचार, जीवन और शिक्षण, शिक्षण विचार, ग्रामदान. संस्कृत - ऋग्वेद सार संकलन, साम्य सूत्रे भारत सरकारने विनोबांना 'भारतरत्न' (मरणोत्तर १९८३) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा