दहावी मराठी १६. आकाशी झेप घे रे (कविता)
कृती १ : (आकलन कृती)
(१) योग्य पर्याय ओळखा :
(1) सुखलोलुप झाली काया म्हणजे - सुख उपभोगण्याची सवय लागते.
(ii) पिंजरा सोडून शेप घेतल्याने - आपल्याला स्व-सामर्थ्याची जाणीव होते.
(iii) देवाने पंख दिल्यामुळे - शक्तीने संचार करता येतो.
---------------------------------------------------
(३) कवीने यशप्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने लिहा :
(i) - तुला देवाने पंख दिले आहेत. सामर्थ्याने विहार कर.
(ii) - कष्टाविण फळ मिळत नाही.
---------------------------------------------------------
कृती २ : (आकलन कृती)
(१) तुलना करा :
पिंजऱ्यातील पोपट
(i) पारतंत्र्यात राहतो
(ii) लौकिक सुखात रमतो
(iii) कष्टाविण राहतो
(iv) जीव कावराबावरा होतो
(v) मनात खंत करतो
*******
पिंजऱ्याबाहेरील पोपट
- स्वातंत्र्य उपभोगतो
- स्वबळाने संचार करतो
- कष्टात आनंद घेतो
- मन प्रफुल्लित होतेसुंदर जीवन जगतो
------------------------------------------
(४) पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा :
- तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने
---------------------------------------------
कृती ३ : (काव्यसौंदर्य कृती)
(१) 'आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा' या ओळींतील मथितार्थ स्पष्ट करा.
उत्तर : 'आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे.
प्रस्तुत ओळीतील मथितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जिवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुखसोईमुळे कर्तृत्व थांबते. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळींतून प्रत्ययाला येते.
----------------------------------------------------------
(२) 'स्वसामर्थ्याची जाणीव' हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, ' हे विधान स्पष्ट करा.
उत्तर : जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. समस्यांचा सामना करता करता कधी माणूस हतबल होऊन जातो. मग तो देवावर हवाला ठेवू लागतो. नशिबाला दोष देतो. पण हे असे वागणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे।' अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणे महत्त्वाचे ठरते. स्वतःच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवता आला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. 'रयत शिक्षण संस्था' निर्माण केली. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की 'स्वसामर्थ्याची जाणीव' हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे.
--------------------------------------------------------
(३) 'घर प्रसन्नतेने नटले, ' याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.
उत्तर : कवी जगदीश खेबुडकर यांनी 'आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल, हे समजावून सांगितले आहे. कोणतीही गोष्ट घरबसल्या मिळत नाही. 'दे रे हरी । खाटल्यावरी' असा चमत्कार होणे शक्य नसते. घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव सांगतो - मला माझ्या आईसाठी थंडीमध्ये स्वेटर विणायचे होते, मी अभ्यासाची व शाळेची वेळ सांभाळून फावल्या थोड्या वेळात दररोज एक तास काढून कष्टाने स्वेटर विणले, ते आईला देताना तिच्या डोळ्यांत जे आनंदाश्रू चमकले, तेच माझ्या कष्टाचे फळ होते. आईचा तो आनंद पाहून मला घर प्रसन्नतेने नटल्याचा अवीट अनुभव आला.
------------------------------------------------------
• प्रश्न. पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत लिहा : 'घामातुन मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले. '
उत्तर : आशयसौंदर्य : सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची 'आकाशी झेप घे रे' ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा अमूल्य संदेश ही कविता देते.
काव्यसौंदर्य : वरील ओळींमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व काबाडकष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो, तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात.
भाषिक वैशिष्ट्ये : ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 'पिंजरा' हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला 'पक्षी' म्हटले आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते.
------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा