20 जून दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
सावियेला दीप प्रेमे, तेवता ठेबू चला.....
→ श्लोक
- यत् यत् आचरति श्रेष्ठः तत् तदेव इतरो जनाः। स यत्प्रमाणं कुरुते लोकः तद्नुवर्तते ॥ थोर पुरुष जे जे आचरण करतो ते तेच इतर (सामान्य) लोक आचरीत असतात. तो (थोर) ज्याला प्रमाण मानतो, त्यालाच प्रमाण मानून लोक अनुसरतात. - श्रीमद्भगवतगीता संस्कार :- थोरांचे अनुकरण करावे.
→ चिंतन
'जगात खरे निर्मोही कोण असतील तर ते पक्षी आहेत.' - मारुती चितमपल्ली मानवाच्या आसपास पसरलेला निसर्ग त्याचा खरा गुरु आहे. माणसाला ज्या गोष्टी अंगी बाणणे शक्य नाही त्या निसर्गात सहजपणे आढळतात. स्वार्थापोटी जगात आज भांडणे, युध्दे चालली आहेत. पक्षी मात्र अशा स्वार्थापासून मुक्त आहेत. त्यांना घरट्याचा, पिल्लांचा तसेच अन्नधान्याचा मोह नसतो. जरुर संपली की त्या गोष्टींपासून ते मुक्त होतात. निरपेक्षबुध्दीने आनंदात राहण्याची कला त्यांच्या कडून शिकायला हवी..
कथाकथन
'सूर्याच्या तेजाने भारतावर राज्य करीत असताना बहुतांश इंग्लिश लोक स्वतःला देव समजत होते, तर भारतीयांना ते माणसेही मानायला तयार नव्हते. म्हणून तर कलकत्त्यातील एका कॉलेजमध्ये इंग्लिश विषय शिकवित असता एक इंग्लिश प्राध्यापक भाषणाच्या ओघात म्हणाला, भारतीय लोक कुत्री आहेत. त्याचे ते विधान ऐकून वर्गातले काही विद्यार्थी काहीच झाले नाही असे समजून थंड बसले, काही विद्यार्थी आतल्या आत चरफडले, तर सुभाषचंद्र बोस नावाच्या एका सोळा वर्षाच्या तेजस्वी तरुणाने त्या प्राध्यापकाच्या दिशेने एखाद्या चित्यासारखी झेप घेतली "आम्हा भारतीयांना कुत्रे म्हणतोस?" अशी गर्जना करून त्या गोऱ्या प्राध्यापकाच्या सणसणीत कानफडात दिली. असली घणाघाती चपराक दुसऱ्या गालावर बसू नये म्हणून तो काळाठिक्कर पडलेला गोरा प्राध्यापक सुभाषला म्हणाला, “बाबारे! तुम्ही भारतीय कुत्रे नसून सिंह आहात हे मी आता कबूल करतो, पण माझा गाल अधिक रंगवू नकोस." अत्यंत बुध्दीमान असलेला हा सुभाष पुढे इंग्लंडला जाऊन आय. सी. एस. ची परीक्षा उत्तीर्ण करुन परत स्वदेशी आला. पण, मोठी मानाची सरकारी नोकरी करण्याऐवजी त्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःला समर्पित करण्याचा निश्चय केला. त्यावेळी भारत अखंड होता. लाहोर शहरात एक प्रचंड सभा होती. सुभाषचंद्र हे त्या सभेचे अध्यक्ष होते. सभा संपल्यावर एक मोठी मिरवणूक निघाली. बंदीहुकूम मोडून काढलेल्या या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीहल्ला सुरु केला. सुभाषबाबूंनाही लाठ्यांचे तडाखे बसू लागले. लोक म्हणाले, “बाबूजी! तुम्ही एका बाजूला चला.” यावर सुभाषबाबू म्हणाले, "का म्हणून? देशभक्तीचे व्रत घेतलेल्या माणसाने लाठ्यांच्या वर्षावाला पुष्पवर्षाव मानले पाहिजे." सुभाषबाबू पुढे भारतीय काँग्रसचे अध्यक्षही झाले. परंतु केवळ अहिंसक चळवळीने भारताला स्वातंत्र्य मिळणे कठीण आहे हे ओळखून व इंग्लंड दुसऱ्या महायुध्दात सापडल्याची संधी आपला देश स्वतंत्र करून घ्यायला अनुकूल आहे. हे हेरून त्यांनी नजरकैदेतून निसटून जायचे ठरविले. त्याप्रमाणे ब्रिटिश सरकारच्या हातावर तुरी देऊन त्यांनी झियाउद्दीन पठाणाच्या वेषात पेशावर गाठले. तिथून काबूल व काबूलहून जर्मनी, जपान इ. देशात जाऊन त्यांनी तिथल्या मोठमोठ्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. | आपला देश स्वतंत्र करण्याच्या प्रयत्नांना त्या नेत्यांकडून भरीव मदत मिळवून सुभाषबाबू शोनानला गेले. तिथे त्यांनी पूर्व अशियात राहणाऱ्या भारतीयांची एक सभा घेतली. याच सभेत, तिथे राहणारे एक थोर भारतीय क्रांतिकारक रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि सुभाषबाबूंना तिचे सरसेनापती पद दिले. सुभाषबाबू जिथे जिथे जात तिथे तिथे जमलेल्या भारतीयांना म्हणत, “तुम्ही मला तुमचे रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो," या आझाद हिंद सेनेसाठी तिथल्या भारतीयांनी अपार त्याग केला. सभेपुढे बोलणाऱ्या बाबूजींच्या गळ्यात फुलांचे हार पडत. सभा संपता संपता त्या हारांचा लिलाव होई. एकेका हाराला लोक एक लाखापासून सात लाखापर्यंत रुपये देत. स्त्रीयांसाठीही राणी लक्ष्मीबाई फलटण काढली होती. परंतु तेवढ्यात जर्मनी व जपान या सेनेला साहाय्य करणाऱ्या दोन्हीही राष्ट्रांचा त्यावेळी चालू असलेल्या महायुध्दात पराभव झाला आणि आझाद हिंद सेनेवर माघार घेण्याचा प्रसंग | आला. तरीही काही मार्ग सापडतो का, याचा विचार करण्यासाठी सुभाषबाबू रंगूनहून विमानाने बँकॉकला चालले असता. विमानात बिघाड होऊन ते खाली कोसळले व त्यात या भारतमातेच्या अलौकिक सुपुत्राचे जीवन समाप्त झाले.
→ सुविचार
•'अत्याचारांशी झगडण्यासाठीच मनुष्याचे जीवन आहे.' - सुभाषचंद्र बोस
→ दिनविशेष पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा स्मृतिदिन - १९८७ : सलीम अलींच्या पक्षीअभ्यासाने त्यांना जागतिक स्तरावरले पक्षीशास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळाली. पक्षीप्रेमातून पक्षी-निरीक्षण करता करता त्यांची निसर्ग अभ्यासाच्या दिशेने वाटचाल चालू झाली. त्यातून निसर्ग-संरक्षण चळवळ जन्माला आली. पक्ष्यांवर प्रेम करताना भारत हा शेतीप्रधान देश आहे याचा विसरही त्यांना कधीही पडला नाही. पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास करताना सजीव साखळीतील एक घटक म्हणूनच त्यांनी पक्ष्यांकडे पाहिले. शेतकऱ्यांचे खरे शत्रू कीटक, पक्षी कीटकांचे भक्षक म्हणून जंगल आणि शेती वाचवायची असेल तर पक्षी जगलेच पाहिजे हा त्यांचा दृष्टीकोन केवळ भाबड्या भूतदयेचा नव्हता. लहानग्या सलीमला लहानपणापासून पक्ष्यांचे वेड होते. त्यांच्या संग्रहात खारी, सरडे, पालीही होत्या. सलीमच्या वडीलबंधूंच्या हाताखाली सलीम पशुपक्ष्यांबद्दल खूप शिकला आणि पक्षीशास्त्रज्ञ व्हायचे त्याच्या मनाने घेतले व खरे करुन दाखविलेही. सलीम अलींनी तारुण्यात हा वसा घेतला तेव्हा त्याला समाजमान्यता नव्हतीच. उलट वेडाचारच म्हटले गेले. अशा परिस्थितीत आर्थिक अडचणींची झळ त्यांना लागू न देण्यात आणि जीवनावश्यक गरजा मर्यादित ठेवण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्या पत्नी तेहमिनाने आणि वडीलबंधू हमीदभाई यांनी केली. आशियातील प्राणीशास्त्रातील, भारतीय पक्षी निसर्ग संरक्षणविषयक कार्यासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सलीम अलींना देशात, परदेशातूनही विविध सन्मान मिळाले. भारत सरकारने पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला.
→ मूल्ये
• निसर्गप्रेम, भूतदया, विश्वबंधुत्व.
→ अन्य घटना
• दाहिर राजाचा वध ७१२
• टिळक विद्यापीठाची स्थापना - १९२१. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे टोकिओस आगमन - १९४३ महाराष्ट्र राज्यात विद्युत मंडळाची स्थापना - १९६०. • ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व द.पु. करमरकर यांचे निधन - १९९१.
→ उपक्रम • सुंदर पक्षी पाहण्याचा छंद लावून घ्या. त्यांची चित्रे काढा.
→ समूहगान
• मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे बसंती चोला.....
सामान्यज्ञान
सर्वात उंच प्राणी जिराफ (आफ्रिका) (६ मीटर) सर्वात वेगवान प्राणी पेरेग्राइन ससाणा (सूर मारतानाचा वेग ताशी ३३० कि.मी.) • मोठा व वजनदार मासा निळा देवमासा (वजन २,००,००० किलोपर्यंत, लांबी २० मीटर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा