6 जून दैनंदिन शालेय परिपाठ
→ प्रार्थना
अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता....
→ श्लोक
दशोपाव्यायांसि गुरु पिता गुरुशताहूनी । सहस्वहि पित्यांहून माता श्रेष्ठचि मन्मनीं ॥
(धर्मकार्य करणाऱ्या) दहा कुलोपाध्यायांहून, विद्यादाता गुरु श्रेष्ठ, शंभर गुरुंहून पिता श्रेष्ठ, आणि सहस्त्र पित्यांहून माता श्रेष्ठ होय ।
चिंतन
जो जनतेचे रक्षण करतो । पोषण करतो धारण करतो तोचि पिता साक्षात मानावा । जन्म देई जो निमित्त केवळ रघुवंश - राजाचे कर्तव्य या श्लोकात फार सुंदर प्रकाराने वर्णन केले आहे. तो जनतेचे पित्याच्या वात्सल्याने रक्षण, पालनपोषण करतो. प्रभू रामचंद्रांसारख्या राजाचे उदाहरण या बाबतीत सहजपणे डोळ्यांसमोर येते. प्रजेचे पालन हेच त्याने कर्तव्य मानले. प्रजेची आज्ञा शिरसावंद्य मानली. प्रजेची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राणप्रिय अशा पवित्र सीतेचा त्यागही केला आणि प्रजेसाठी राजा असतो, राजासाठी प्रजा नाही हा आदर्श घालून दिला. म्हणूनच प्रभू रामचंद्र एक आदर्श शासनकर्ता म्हणून अमर झाला आहे.
→ कथाकथन -
'शिवराज्याभिषेक' : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जिजाऊसाहेब पांढरीशुभ्र वस्त्रे परिधान करून सदरेवर बसल्या होत्या. जे स्वप्न आपण पाहिले होते तो क्षण साकार होतांना जिजाऊसाहेबांच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते. गागाभट्टांनी वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली तेव्हा जिजाऊसाहेबांनी हात जोडले आणि मनातल्या मनात तुळजाभवानीला साकडे घातले की, शिवबाचे राज्य निष्कंटक होवो. ' गागाभट्टांनी जेव्हा सिंहाचा मुखवटा असलेला राजदंड राजांच्या हातात दिला तेव्हा राजांनी जिजाऊसाहेबांकडे पाहिले. जिजाऊसाहेबांनी उजवा हात किंचित वर करून राजांना आशीर्वाद दिला. त्यानंतर राजांनी तो राजदंड मस्तकी लावून हात जोडले. रत्नखचित सिंहासनाकडे पाहिले. राजांचे डोळे भरून आले. ह्या सिंहासनावर आपण आता राजा म्हणून बसणार, परंतु ह्या क्षणासाठी किती भक्तांनी आपले जीव अर्पण केले त्याची आठवण शिवाजी महाराजांना झाली. राजे सिंहासनापुढे नतमस्तक झाले आणि सिंहासनाला चरणस्पर्श न करता ते सिंहासनारूढ झाले तेव्हा, संपूर्ण राजदरबार आनंदाने महाराजांचा जयजयकार करू लागला. अचानक जिजाऊसाहेब सरदेवर उभ्या राहिल्या आणि ह्या वृध्द आईने राजांना वाकून कुर्निसात केला, तेव्हा राजे चपापले. आपली आई वाकून आपल्याला सलामी का देत आहे, याचा उलगडा राजांना होईना... राजे गप्प झाले. जिजाऊसाहेबांनी नंतर आपल्या आनंदाश्रूंना मोकळेपणाने वाट करून दिली. दरबार संपला आणि राजे तडक जिजाऊसाहेबांच्या महालाशी आले. महाराज येत आहेत हे जिजाऊसाहेबांना कळल्यावर जिजाऊसाहेब उठून बसल्या. वास्तविक वृध्दपणामुळे चटकन त्यांना उठता येत नव्हते. परंतु आपला लाडका लेक आता राजाच्या स्वरुपात येतो आहे ह्याची जाणीव त्यांना झाली. राजे आले आणि त्यांनी जिजाऊसाहेबांच्या पायावर लोळण घेतली. जिजाऊसाहेबांनी राजांना अलगद उठवले. राजे म्हणाले, “ मांसाहेब, आम्ही आपल्या पदराखाली मोठे झालो. आपले आर्शीवाद घेण्यासाठी आलो. आज मी खूप दानधर्म केला. परंतु मांसाहेब, पृथ्वीचे दान केले तरी आपले ऋण फिटणार नाही...." राजांची ही नम्रता पाहून आईचा जीव भरून आला. जिजाऊसाहेबांनी राजांना जवळ ओढले आणि प्रेमाच्या मिठीत सामावून घेतले..... मुलांनो, धन्य तो शिवबा, ज्याने आपल्या आईचे पांग फेडले. आणि धन्य ती आई, जिने शिवबाला राजा म्हणून घडविले.....
सुविचार
• 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती सर्व जगाला उध्दारी
• हिच 'जिजाऊ'जींच्या प्रेरणे, उजळे स्वराज्य ज्योती । हिच जिजाऊ जिने घडविले राजा शिवछत्रपती ॥
→ दिनविशेष
• शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक - १६७४: शिवरायांनी सतत तीस वर्षे धडपड करून एक करोड होनांचे स्वतःचे राज्य निर्माण केले. ही एक जहागिरी नसून स्वतंत्र सार्वभौम राज्य आहे हे हिंदुस्थानातील सर्व राज्यकर्त्यांना कळावे आणि त्या राजाला हिंदू धर्माच्यावतीने इतरांना जाब | विचारायचा अधिकार आहे हे सर्वांना कळून त्यांना जरब बसावी या हेतूने शिवरायांनी राज्याभिषेकाचा विधी यथासांग पार पाडायचे ठरविले. राज्यभिषेकाचा मुहूर्त ५ जून रोजी उत्तररात्री होता. रायगडावर राज्याभिषेकाची धुमधडाक्याने तयारी सुरू झाली. काशीचे महाविद्वान पंडित गागाभट्ट यांनी या सोहळ्याचे संचालन केले. महानद्यांचे पवित्र जल, सुलक्षणी हत्ती, घोडा, व्याघ्र मृगचर्म, छत्रचामरे, सुवर्णकलश, सिंहासन अशा सर्व साहित्यानिशी थाटामाटाने राज्याभिषेक सोहळा पार पडला. पहाटेच्या वेळी नवीन वस्त्रे परिधान करून शिवराय राजसभेत सिंहासनावर विराजमान झाले. गागाभट्टांनी छत्र घेऊन त्यांच्या मस्तकी धरले व जयघोष केला. 'क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज...' आणि शिवाजीमहाराजांना राजा म्हणून इतरांची मान्यता मिळाली.
मूल्ये -
-• स्वाधीनता, निर्भयता, कर्तव्यदक्षता, राष्ट्रप्रेम.
→ अन्य घटना
• प्रसिध्द मराठी विश्वकोशकार गणेश रंगो भिडे यांचा जन्म १९०९ शिवराज्याभिषेक शके ३३४ प्रारंभ (१६७४) • रशियाने सोयुझ ११ हे अंतराळयान सोडले. या यानात वजनरहित अवस्थेत वनस्पतींची वाढ करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग -१९७१ • इंदिरा गांधींच्या कारण प्रीत शीख अतिरेक्यांचा नाश करण्यासाठी लष्कराच्या मदतीने सुवर्णमंदिरावर हल्ला चढविला. - १९८४ • वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रायन लारा याने प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात ५०१ धावा काढून नवीन विक्रम प्रस्थापित केला. -१९९४
→ उपक्रम
• शिवरायांच्या आयुष्यातील रोमांचक घटनांचा एकपात्री प्रयोग करा. जवळच्या किल्ल्यांवर सहल काढा. ● प्रसिध्द इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांचे 'शिवरायांचा खरा इतिहास' हे पुस्तक मिळवा व वाचन करा.
→ समूहगान
इन्साफ की डगरपे, बच्चो दिखाओ चलके....
→ सामान्यज्ञान
• ड्रॉसेरा व नेपथस ह्या वनस्पती मांसाहारी आहेत. • सह्याद्री पर्वतावर सापडणारी दुर्मिळ वनस्पती सर्पगंधा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा